बेळगाव: बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे येणार होते परंतु, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गडकरी यांना, “गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात , मराठी माणसाच्या विरोधात बेईमानी नको, असे म्हणत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला न येण्याचे आवाहन केले होते. राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडकरी यांनी त्यांचा दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गडकरी यांच्याऐवजी आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवी हे बेळगावमध्ये प्रचाराला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस हे बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
गेल्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली होती. तेव्हा आताच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा महाराष्ट्रातील कोणताही नेता प्रचारासाठी येणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. पण तसे झाले तर तो नेता महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असे शुभम शेळके यांनी सांगितले.
बेळगावातील मराठी जनता जागी झाली आहे. भाजपकडे मुद्दे काहीच नाहीत. त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पाडण्याची त्यांची खेळी आहे. पण मराठी माणसांचे डोळे उघडले आहेत. राष्ट्रीय पक्षांचा ढोंगीपणाचा बुरखा फाटला आहे. त्यांच्या डावपेचांचा मराठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर काहीही फरक पडणार नाही, असे शुभम शेळके यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना म्हटले आहे.