पुणे—पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा (पीएमपीएमएल बससेवा) सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाजपने विरोध केला असून आज पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि माजी आमदार शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश बापट आणि जगदीश मुळीक आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल(दि.३) पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक निर्बंध लागू करण्यात आले. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली. यावेळी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याचीही घोषणा झाली. तसेच, पुणे पीएमपीएमएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याचंही जाहीर केलं. मात्र, पीएमपीएल सेवा पुन्हा सुरू करा या मागणीसाठी खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथील पीएमपीएलच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.तसेच संचारबंदीचा आदेश आपण पाळणार नसल्याचे मुळीक यांनी यावेळी जाहीर केले.
पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी बापट आणि मुळीक यांची भेट घेत त्यांना जमावबंदीमुळे आंदोलन संपवण्याची विनंती केली.मात्र यावेळी भाजप नेत्यांनी त्यांची विनंती धुडकावून लावत माघार घेण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यीवेली बोलताना बापट म्हणाले, मिनी लॉकडाऊनमध्ये घेतलेल्या काही निर्णयांना आमचा विरोध आहे. त्यामध्ये पीएमपीएमएल बससेवा बंद करू नये अशी आमची मागणी आहे. कारण, पुण्यात राहणारा किंवा पुण्यात कामाला येणारा जो उद्योगधंद्यात काम करतो, तो जर येऊ नाही शकला तर हे सर्व उद्योग बंद पडतील. म्हणून कंपन्यांना विनंती करावी की, तुमची वाहनसेवा सुरू करून त्याद्वारे कामगारांना घेऊन जावं किंवा कामगारांसाठी वेगळी पीएमपीएएलची व्यवस्था करा, ओळखपत्र तपासा. उगाच इकडं तिकडं फिरणाऱ्यांवर बंधनं आणली तर आमचं काही म्हणणं नाही. कारण परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पण, अशी अनेक घरं आहेत की दिवसभर काम नाही केलं तर संध्याकाळी चूल पेटत नाही. त्यांनी काय करावं? त्यांची आरोग्याची काळजी घेताना, त्यांच्या जीवनाची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणून पीएमपीएलच्याबाबतीत ५० टक्क्यांचा जो नियम होता तो ४० टक्क्यांवर करा, बाहेर जाणाऱ्या कामगारांना प्राधान्य द्या, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या”, अशी मागणी बापट यांनी केली.
तसेच, हॉटेल्स पूर्णपणे बंद करण्यासही त्यांनी विरोध केला आहे. हॉटेल पूर्ण बंद न ठेवता, उभं राहून खाण्याची व्यवस्था ठेवावी. पार्सल सुविधा रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवावी. जेणेकरुन बाहेरगावच्यांची उपासमार होऊ नये यासाठी हे महत्वाचं आहे. शहरातील हातगाड्यांवर पाच पेक्षा अधिक लोकं जमू नये, असंही बापट म्हणालेत.