मुंबई- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मोठा गौप्य स्फोट केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते असा खुलासा परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केला आहे. त्यामध्ये त्यांनी या संदर्भातील चॅट एसएमएसचा उल्लेख केला आहे. याबाबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही चौकशी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊनच करावी अशी मागणी केली आहे.
फडणवीस म्हणाले, परमबीर सिंग यांनी चॅट एसएमएसचा उल्लेख त्यांच्या पत्रात केला आहे. तो एक प्रकारचा अपरिवर्तनीय पुरावा आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल. एखादा पुरावा घटनेनंतर निर्माण झाला असेल तर वेगळी गोष्ट परंतु परमबीर सिंग यांच्या बदलीच्या आधीचा पुरावा असा ते दाखवत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पापावर पांघरून घालण्यासारखे आहे. या संदर्भातली जबाबदारी नक्की झालीच पाहिजे. या प्रकरणाची चौकशी गृहमंत्री आपल्या पदावर आहेत तोपर्यंत होऊच शकत नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन ही चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली.