मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याचे उघड झाल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी घडत आहे. या प्रकरणी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) ने अटक केले आहे. त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने तर राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्रीद उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट बार, हॉटेल आणि अन्य संस्थांकडून करायला सांगितले होते असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला होता.
दरम्यान, या प्रकरणावर कॉँग्रेसने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. कॉँग्रेसचे नेते व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत हे भाजपचे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे फार मोठे षड्यंत्र असल्याचे म्हणत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
सावंत म्हणाले,ज्याप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विरोधात जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केले जात आहे तसेच जिथे जिथे विरोधी पक्षांचे सरकार तिथे तिथे त्या सरकारच्या विरोधात मुद्दाम असे वातावरण तयार केले जात आहे. या देशात विरोधी पक्षांची सरकारे टिकून दिली जात नाही त्यासाठी कुठल्याही पातळीला जाण्याची तयारी भाजपची असते. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून जनतेने पाठिंबा दिला नसला तरी असे करून सत्ता बळकवायची हे वारंवार विविध राज्यात दिसून आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सत्तेसाठी भाजप करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे जाणून बुजून प्रयत्न सुरू असून कुठलीही शहानिशा न करता या पत्रावरून राज्यातील सरकार अस्थित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगून सावंत म्हणाले,कायदा सुव्यवस्था बिघडली आहे असे वातावरण तयार करण्याचे षड्यंत्र आहे.
गुजरातमधील तत्कालीन पोलिस प्रमुख डी. जी. वंजारा यांनीही 2012 मध्ये पत्र लीहून तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात असेच आरोप केले होते. ते विसरले का? असा प्रश्न उपस्थित करत अमित शहांनी त्यावेळी राजीनामा दिला होता का?, एका अधिकाऱ्याने पत्र लिहून आरोप करणे हे पहिल्यांदा घडते आहे का? असा सवाल केला.
तसेच निवृत्त झाल्यानंतर 6 वर्षानंतर पुन्हा वंजारा यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले तेव्हा त्यांनी केलेलया आरोपांची शहानिशा केली होती का? त्यांनी केलेले आरोप सत्य नव्हते का? असेही प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री तत्कालीन पोलिस अधिकारी संजीव भट यांनी देखील असेच आरोप केले होते त्यावेळी मोदींनी राजीनामा दिल होता का? असा सवाल करत लेटर बॉम्ब, लेटर बॉम्ब असा गाजावाजा करत तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागता आहात मग तुम्ही दिला होता का? असे म्हणत एक स्वत:करता तर दूसरा दुसऱ्या करता असे भाजपचे दोन मापदंड आहेत असा आरोप त्यांनी केला.
परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राबाबत बोलताना ते म्हणाले, ते बदली झाल्यानंतर बोलत आहेत. पत्रात काय तथ्य आहे हे समजून घेतले पाहिजे. गेले वर्षभर बार आणि हॉटेल बंद आहेत. तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात माहिती होते मग त्यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहिले नाही? का समोर माहिती आणली नाही? असा सवाल त्यांनी केला तुमच्यावर कारवाई करणार आहे हे माहिती असल्यामुळे तुम्ही एसएमएस मधून माहिती मागवून घेण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर केला.