दिल्ली(ऑनलाइन टीम)— मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट बार, हॉटेल आणि अन्य संस्थांकडून करायला सांगितले होते असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला होता. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेवून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केलले 100 कोटींच्या वसुलीचे आरोप गंभीर आहेत मात्र, त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही असे पवार म्हणाले. परमबीर सिंग यांची माझ्याशी भेट झाली होती असे सांगत या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंग यांचाच होता. त्यांच्या पुनर्नियुक्तिमध्ये गृहमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा काहीही हात अथवा संबंध नाही असे त्यांनी सांगितले असे सांगत 100 कोटी कोणाकडे गेले यांचा पत्रात उल्लेख पत्रात नसल्याचे ते म्हणाले. बदली झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी आरोप केले. आयुक्त असताना त्यांनी असे कुठल्याही प्रकारचे आरोप केले नाहीत. मनसुख हिरण यांची गाडी वाझे यांनी घेतली आणि त्यात स्फोटक ठेवली असे त्यांनी सांगितले. फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर ते पत्र समोर आले, असा आरोपही पवार यांनी केला.
दरम्यान, चौकशीचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा. चौकशी करण्याचे आदेश देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. या प्रकरणाचा सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही, सरकार स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदे अगोदर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. परंतु, त्याअगोदर आमच्याशी चर्चा करतील. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु त्यात यश मिळणार नाही असे सांगतानाच गृहमंत्र्यांचे म्हणणे देखील याबाबत ऐकून घेतले जाईल असे ते म्हणाले. परमबीर सिंग यांनी आता केलेले आरोप याआधी का केले नाही. पत्रात आरोप केले आहेत परंतु त्यांचे पुरावे काहीच नाहीत. उद्या किंवा परवा आम्ही एकत्र बसू गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय सर्वांशी बोलून घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.