सातारा – केंद्र सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात पॉप सिंगर रेहाना हिने ट्वीट केल्यानंतर सचिन तेंडूलकरने त्याला प्रत्युत्तर म्हणून “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात पण हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि देश म्हणून आपण एकत्र राहूया.” असे ट्वीट केले होते. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्याला माहिती नसलेल्या क्षेत्राबद्दल बोलताना काळजी घ्यावी असा सल्ला दिला होता. त्यावरून आता राजकीय वादंग सुरु झाला असून शरद पवार यांच्यावर निशाना साधला जात आहे.
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून, “कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात. पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं ते ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही,” अशी टीका केली होती. आता रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी कधी लंगोट बांधून कुस्ती खेळली होती का? लहानपणी नारळावरच्या कुस्त्या खेळल्या असतील त्या सोडा असे म्हणत अनेकांना वाटत मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पध्दत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक असल्याचे सदाभाऊ खोत यांनी नमूद केले.