पुणे- पुणे पदवीधर मतदार संघ आणि शिक्षण मतदार संघाच्या मत पत्रिकांच्या छाननीला गुरुवारी दुपारी सुरुवात झाली असून रात्री उशिरा सुमारे एक लाख मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाली आहे. उर्वरित मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेला कोटा निश्चित करून निवडणूक आयोगाकडून मतमोजणीला सुरुवात होईल. शिक्षक मतदार संघातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध, अवैध व पहिल्या पसंती क्रमांकाची प्रक्रिया पूर्ण होत रात्री आठपर्यंत पूर्ण होत आली होती.दरम्यान, सद्यस्थिती पाहता पदवीधरच्या निकालाला शुक्रवारची सायंकाळ तर शिक्षकच्या निकालासाठी शुक्रवारची सकाळ उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे पदवीधर साठी 2 लाख 47 हजार 50 इतके मतदान झाले असून एकूण मतदानाच्या 57.96 टक्के मतदान झाले आहे तर शिक्षक मतदारसंघात 52 हजार 987 मतदान झाले , एकूण मतदानाच्या 73.04 टक्के मतदान झाले आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत.
दरम्यान, २२०० मतपत्रिकांचा एक गठ्ठा तयार करण्यात आला असून एकूण ११२ टेबलवर छाननी सुरु आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर वैध मत पत्रीकांमधील पहिल्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतांची मोजणी करताना जो उमेदवार विजयासाठी निश्चित करण्यात आलेला कोटा पूर्ण करेल तो उमेदवार विजयी ठरेल. मात्र, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोटा पूर्ण करण्यात उमेदवारा अयशस्वी झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी देखील केली जाईल. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.
आत्तापर्यंतच्या झालेल्या मतपत्रिकांच्या छाननीनंतर मतदारांचा कल महाविकास आघाडीचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड तर शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या बाजूला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये पुढे असून, माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांनी देखील चांगली मते घेतली आहेत. तसेच मते बाद होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत शिक्षक मतदार संघाचा कोटा निश्चित होईल. यात पहिल्या पसंतीत आसगावकर यांनी कोटा पूर्ण केल्यास मध्यरात्री पर्यंत शिक्षकचा निकाल जाहीर होईल. परंतु सावंत आणि पवार यांनी घेतलेली मते लक्षात घेता पहिल्या पसंतीमध्ये निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. असे झाल्यास शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी देखील शुक्रवारची पहाट उजाडेल.दरम्यान,पदवीधर मध्ये देखील मतपत्रिकांचे गठ्ठे बांधण्याचे काम सुरू आहे. हा अंतिम निकाल लागण्यासाठी शुक्रवारी सायंकाळ होईल. आसगावकर, सावंत व जाधव यांनी सिंगल मते अधिक घेतली आहे.