पुणे—गेल्या ३३ दिवसांपासून बेपता असलेले पुण्यातील प्रसिध्द उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आल्यानंतर पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण काय होते? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आर्थिक नुकसानामुळे गौतम पाषाणकर नैराश्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गेल्या 34 दिवसात त्यांनी देशाच्या विविध शहरांत प्रवास केल्याचं समोर आलं आहे.
गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला, आणि ते घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिसमधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले.गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली. तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासून व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. यानंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला.
गौतम पाषाणकरहे भाड्याची एक गाडी करून ते कोल्हापूरला गेले होते. हे समजल्यावर पुणे पोलीस कोल्हापूरला पोहचले होते. तेथील तारा राणी चौकात ते कारमधून उतरल्याचे व एका हॉटेलमधून पार्सल घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यानंतर ते कोकणात गेल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर त्यांचा शोध लागला नव्हता. जवळपास ३३ दिवसांनंतर पोलिसांना पाषाणकरांचा शोध लागला .
विविध शहरांमध्ये फिरताना त्यांनी कुटुंबाचा विचार केला. आपण चुकीचं पाऊल उचलल्यास त्याच्या होणाऱ्या गंभीर परिणामांची त्यांना कल्पना आली. म्हणूनच त्यांनी आत्महत्येचा विचार सोडला. याशिवाय त्यांच्या बेपत्ता होण्यामागे दुसरे कोणतेही कारण नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.