कोरोनाशी दोन हात करणारी समर्थ भारत अभियानची ‘वॉर रूम’


पुणे- कोरोना महामारीच्या संकट काळात अनेक स्वयंसेवी संस्था युद्ध पातळीवर काम करत आहेत. पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयातून सुरू झालेल्या ‘समर्थ भारत अभियाना’च्या अंतर्गत विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था गेल्या वर्षीप्रमाणेच तयारीनिशी कामाला लागल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेऊन यावर्षी सुरू करण्यात आलेला त्यातलाच एक अत्यंत आवश्यक ठरलेला उपक्रम म्हणजे ‘वॉर रूम’!

कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत माणसं सैरभैर झाली होती. मदत कुठे मिळेल? कोणत्या दवाखान्यात बेड मिळेल, व्हेंटिलेटर कुठे उपलब्ध होईल, ऑक्सिजन कुठून आणायचा, लसीकरण कुठे होईल? रुग्णवाहिका कुठून बोलवायची – ते अगदी जेवणाची सोय कुठे होईल? याची माहिती मिळवताना रूग्णाच्या नातेवाईकांच्या नाकीनऊ येत होते.

अधिक वाचा  ग्लेनमार्कने टाईप २ मधुमेहींसाठी भारतात सादर केली एफडीसी झिटा -पियोमेट टॅबलेट

पुण्यात कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर तिथल्या हेल्पलाईनचा फोन दिवसभर खणखणू लागला. रोज येणाऱ्या ५०० पैकी ४५० फोन तर केवळ वैद्यकीय मदतीच्या चौकशीसाठी असायचे. त्यातूनच रुग्णाच्या नातेवाईकांना खात्रीशीर माहिती देणारी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता लक्षात आली आणि आठवड्याभरात ही रचना उभी करण्यात आली, तीच ही ‘वॉर रूम’! समर्थ भारत अभियानाचे ३५ प्रशिक्षित तरुण कार्यकर्ते या ‘वॉर रूम’मध्ये सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत ३ शिफ्टमध्ये काम करत आहेत.

कोविड केअर सेंटरच्या माहितीबरोबरच सोळा विविध सेवांची माहिती नागरिकांना देण्यात येते. शहरातील रुग्णालये, रक्तपेढया, प्लाझ्मा डोनर, तज्ञ डॉक्टरांचे संपर्क तसेच ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स असणारे बेड, साधी व ऑक्सिजनसज्ज रूग्णवाहिका यांची उपलब्धता,  रुग्णोपयोगी साहित्य कुठे मिळेल, जेवणाचे डबे कुठे मिळतील याची माहिती आणि अगदी दुसर्‍या शहरातील कोविड केअर सेंटरचे संपर्कसुद्धा गरजूंना मिळण्याची सोय या ‘वॉर रूम’मुळे झाली. धास्तावलेल्या आणि हतबल झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यामुळे मोठा धीर मिळाला आहे. सुमारे दीड ते दोन हजार नागरिकांना आत्तापर्यंत या ‘वॉर रूम’चा फायदा झाला आहे.  ‘वॉर फुटींग’वर काम करणाऱ्या या ‘वॉर रूम’मुळेच रक्तदान शिबीरे आयोजित करून दीड महिन्यात साडेदहा हजार रक्त पिशव्यांचे संकलन करणे शक्य झाले आहे.

अधिक वाचा  कोरोनाशी झुंज देणाऱ्या आईचा जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवी मृत्यू

आता लसीकरण, पोस्ट कोविड ओपीडी, ऑक्सिजन बेड सेंटर आणि समुपदेशन अशा चार विभागात काम सुरू आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची पुन्हा आत्मीयतेने चौकशी करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन देखील सुरू करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण योजना सुरळीत होणे, संभाव्य तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी आवश्यक तयारी,आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची योजना अशी कामे आता सुरू आहेत. आगामी काळात लहान मुलांसाठी बालरोग तज्ञ आणि त्यांची टीम तयार करण्याची आणि त्यासाठीच्या हेल्पलाईनची तयारी सुरू आहे, अशी माहिती *समर्थ भारत* अभियानाचे समन्वयक श्रीपाद दाबक आणि मुग्धा वाड यांनी दिली. आता कोरोनाच्या रूणांची संख्या कमी होत आहे. मात्र अजूनही गरज लागल्यास खालील मोबाईल फोन क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

अधिक वाचा  सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी : शिवराज राक्षेला झोळी डावावर केले २२ सेकंदात चितपट

*समर्थ भारत हेल्पलाइन –* ७७६९००३३०० आणि  ७७६९००४४००

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love