रंगमंचावर आलं की मला इलेक्ट्रीफाइन झाल्यासारखं वाटतं- विक्रम गोखले

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -रंगभूमीवर किंवा नाट्यगृहातील रंगमंचावर आलं की मला इलेक्ट्रीफाइन electrifine झाल्यासारखं वाटतं. आजही ते फिलिंंग आहे. कारण रोज स्वत:ला नवे काही तरी शिकण्याची संधी जेथे मिळते ते ठिकाण म्हणजे रंगमंच किंवा रंगभूमी होय. त्यामुळे प्रत्येकाने नाटक करायला पाहिजे,अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले vikram gokhale यांनी आज व्यक्त केल्या. यावेळी नटखट उल्लेख करत ज्या नटांना कधीच असुरक्षित वाटत नाही त्यापैकी एक म्हणजे मोहन जोशी असे गौरवोदगार त्यांनी काढले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह वर्धापन दिन आणि यशवंतराव स्मृती दीना निमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यावर्षी अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना आज ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले आणि अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्योती गोखले यांचा सन्मान स्वप्नाली गोखले यांनी केला. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ५,००० मानपत्र, पुणेरी पगडी, शाल असे आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते प्रशांत दामले, मराठी उद्योजक अमित गोखले, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, समीर हंपी, प्रवीण बर्वे, सत्यजित धांडेकर , दीपक गुप्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमात करोनाच्या काळात विशेष करणा-या पुण्यातील विविध क्षेत्रातील परिचारिका माधुरी गायकवाड, सफाई कामगार सागर निकम, वैकुंठ स्मशानभूमीतील विलास अडागळे, कलाकारांना मदत करणारे धनंजय पुरकर, यांना करोना योध्दे खास सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमासाठी चव्हाण नाट्यगृहाची देखभाल करणा-या महापालिकेच्या उपायुक्त रंजना घुगे, रंगमंदिरांचे व्यवस्थापक सुनील मते यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

विक्रम गोखले म्हणाले,  जगात अभिनय क्षेत्रातील एकूण लोकांपैकी ९९ टक्के लोकांना सतत असुरक्षित वाटते पण असुरक्षित न वाटणा-या एक टक्के नटांमध्ये मोहन जोशी यांचा समावेश आहे. करोनाच्या संकटानंतर पुन्हा एकदा उदबत्त्यांचा दरवळ, प्रकाशमान झालेला रंगमंच, वाजणारी तिसरी घंटा असे चित्र पुर्नस्थापित होणे गरजेचे आहे. आम्ही कलावंत म्हणजे करोनाच्या काळात गाडी चुकलेले प्रवासी आहोत. आम्ही गाडी पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्यासाठी रसिकांची साथ मिळणे गरजेचे आहे. करोनाच्या काळात दुरावलेले रसिक आणि कलाकार यांच्यातील ऋणानुबंध पुन्हा लवकरात लवकर पूर्ववत व्हावेत यासाठी रसिकांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रशांत दामले यांनी त्यांचा गंधार म्हणजे गाणं जपावे असा चिमटाही त्यांनी काढला.

सत्काराला उत्तर देताना मोहन जोशी यांनी लहानपणापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. राजन मोहाडिकर याच्या ऐवजी टुणटुण नगरी खणखण राजा या बालनाट्यात रंगमंचावर पाऊल ठेवले तेव्हापासूनचा हा प्रवास आहे असे सांगून ते म्हणाले, या पुण्याने मला उत्तम बालपण दिले, गुरूजन दिले, उत्तम मित्र दिले. नाटकं दिली,उत्तम दिग्दर्शक दिले. मला स्थैर्यही दिले. त्यानंतर करियर करायला मी मुंबईत आलो. पुण्याच्या स्थैर्यामुळे मला मागे वळून बघण्याची वेळ आयुष्यात कधीच आली नाही.

प्रशांत दामले म्हणाले मी 12 मार्च 20 या दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रंगमंचावर उभा होतो त्यानतर आज उभा आहे. आजचा कार्यक्रम हा नवी उर्जा देणारा आहे. पुण्यात बालगंधर्व जर सचिन तेंडुलकर असेल तर चव्हाण नाट्यगृह हे विराट कोहली आहे. रंगमंचावर असलेले विक्रम गोखले आणि मोहन जोशी म्हणजे हक्काने कान धरणारी मंडळी आहे. त्यांच्यासारख्यामुळेच मी कुठे चुकतोय का ते तपासण्याची सवय मला जडली. त्यांनी दाखवलेल्या चुका सुधारत मी वाटचाल केली. ज्या यशवंतराव चव्हाण यांनी नाटकांवरील कर रद्द केला त्यांच्या स्मृतीदिनी पुन्हा एकदा रंगमंचावर पाऊल ठेवण्याची संधी मिळली हा चांगला योग आहे. प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्यजीत धांडेकर यांनी केले. मानपत्राचे वाचन दीपक रेगे यांनी तर लेखन राजन मोहाडीकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात नीरजा थोरात यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. सूत्रसंचलन योगिनी पोफळे यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *