पुणे- पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुणे पदवीधर मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला आहे तर राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे भैय्या माने यांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान, अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत ही बंडखोरी राहणार की बंडखोर माघार घेणार हे स्पष्ट होईल.
महायुतीचा घटक असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीत बंडखोरी केली आहे. रयत क्रांतीचे उमेदवार एन. डी. चौगुले यांनी गुरुवारी पुणे पदवीधरसाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सदाभाऊ खोत हे यावेळी त्यांच्यासोबत होते. आपण महायुतीतच आहोत. मात्र, एक स्वतंत्र पक्ष म्हणून ही निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता होती. त्यामुळे हा अर्ज दाखल केल्याचे सदाभाऊ खोत यांनी या वेळी स्पष्ट केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीतही बंडखोरी
दुसऱया बाजूला राष्ट्रवादीच्या भैय्या माने यांनीही अर्ज दाखल करीत बंडखोरी केली आहे. तर नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे माजी प्रदेशाध्यक्ष व मातंग समाजाचे नेते मनोज कांबळे यांनीही उमेदवार अर्ज दाखल केला आहे. आता चौगुले व माने हे अर्ज कायम ठेवणार की माघार घेणार, याबाबत उत्सुकता आहे.