पुणे -महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे, हे चंद्रकांत पाटील यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीही हे सरकार पूर्ण करेल. मात्र, हे सरकार टिकणार नाही, असे सांगण्यातच भाजप आणि चंद्रकांतदादांची चार वर्षे निघून जातील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे लगावला.
भाजपतर्फे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी काल अर्ज सादर केल्यानंतर पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेते या वेळी उपस्थित होते. हे सरकार चार वर्षे चालणार नाही, या चंद्रकांतदादांच्या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर चंद्रकांतदादांनी हे सरकार दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणार नसल्याचे म्हटले होते. आता सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे. त्यांचे आत्ताचे भाकीतही असेच खोटे ठरेल.
अरुण लाड चांगल्या मतांनी विजयी होतील
पक्षाचे उमेदवार अरुण लाड हे मागील सहा वर्षांपासून अतिशय समर्थपणे पक्षाचे काम करीत आहेत. लोकसभा असो किंवा विधानसभा असो. तसेच पक्षाच्या अन्य कामात वा उपक्रमातही त्यांचा पुढाकार राहिला आहे. महाराष्ट्रातील एक सहकारी कारखाना त्यांनी अत्यंत उत्तमपणे चालवला आहे. ते स्वच्छ आणि उत्तम चारित्र्याचे उमेदवार आहेत. त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसह इतर मित्र पक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ते चांगल्या मतांनी विजयी होतील, असा विश्वास पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.