पुणे- मराठा आरक्षणाविषयी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी बोलावलेल्या मराठा-विचार मंथन बैठकीवर मराठा क्रांती मोर्चाने बहिष्कार टाकला आहे. या बैठकीमध्ये सहभागी न होण्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. घेतली. त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नाशिक येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला अंदर विनायक मेटे यांना निमंत्रण दिले होते. त्यावेळी ते उपस्थित राहिले नाही. अशाप्रकारे वेगळी बैठक घेणे योग्य नाही असे मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटले आहे.
शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज पुण्यामध्ये ‘मराठा विचार-मंथन बैठक’ बोलावली आहे. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे समाजात वेगवेगळ्या मराठा संघटनांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत मराठा चळवळीला योग्य अशी दिशा मिळावी तसेच मागण्या,न्यायालयीन लढा, पाठपुरावा व उपाययोजना यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी, समाजातील राज्यभरातील विचारवंत, तज्ञ, कायदेतज्ञ तसेच मराठा चळवळीतील कार्यकर्ते यांची बैठक असल्याचे शिवसंग्रामने म्हटले आहे. परंतु, या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे.
सर्व संघटना बाजूला ठेवून मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. गेल्या 26 सप्टेंबरला नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. त्याला सर्व संघटनांचे नेते, खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे यांना निमंत्रित करण्यात आले होते. संभाजीराजे या बैठकीला स्वत: उपस्थित होते. तर उदयनराजे यांनी त्यांच्या अडचणीमुळे आपल्या भाच्याला बैठकीला पाठवले होते. या बैठकीचे निमंत्रण आमदार विनायक मेटे यांनाही देण्यात आले होते मात्र, ते या बैठकीला हजार राहिले नाही. आजची बैठक ही शिवसंग्रामची वैयक्तिक बैठक आहे. वास्तविक त्यांनी नाशिकच्या बैठकीला हजर राहाणे अपेक्षित होते. आशा तऱ्हेने वेगळी बैठक बोलावणे योग्य नाही. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊन दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशी वेगवेगळी बैठक घेऊन समाजाची एकत्र बैठक असताना तिथे येवून आपली भूमिका मांडा. अनेक संघटनांनी मोर्चे, आंदोलने झाली परंतु जेव्हा मराठा क्रांती मोर्च्याच्या बॅनर खाली सर्व संघटना एकत्र आल्या तेव्हाच आरक्षणाचा खरा मार्ग निघाला त्यामुळे अशा वेगळ्या बैठक घेणे चुकीचे आहे असे मत मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक धनंजय जाधव यांनी व्यक्त केले. तर शिवसंग्रामचे पदाधिकारी तुषार कांकडे यांनी या बैठकीला तज्ञ, कायदेतज्ञ आणि विचारवंतांना आणि मराठा समजाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. कोणाला वायक्तिक निमंत्रण दिलेले नाही. ज्यांना वैयक्तिक निमंत्रण दिले नाही ते अशी भूमिका घेत असतील असे सांगितले.
दरम्यान, मराठा समाजाला एसइबीसी नुसार आरक्षण मिळणे शक्य नाही, त्यामुळं EWS अंतर्गत जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यावं, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली आहे. पुणे येथे पत्रकार परिषद घेत प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली.
मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणवणारे नेते या विषयाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याची टीका प्रवीण गायकवाडांनी केली. आंदोलनामुळे समाजातील तरुणाईचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आता ते सगळं थांबवून जागतिकीकरणाचे लाभ घेण्याची मानसिकता बाळगणं गरजेचं आहे, असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.त्यामुळे मराठा आरक्षणावरून मराठा समाजातील नेत्यांमध्ये एकमत होताना दिसत नाहीये.