पुणे(प्रतिनिधी)–महिलांची अखिल भारतीय संघटन असलेल्या ‘राष्ट्र सेविका समिती’ला या वर्षी ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. विजयादशमीचे औचित्य साधून पुणे महानगरात ९ ठिकाणी सघोष पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अडीच हजार सेविका सहभागी झाल्या होत्या. उर्वरित संचलने येत्या रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) पार पडणार आहेत.
पुणे महानगरात समाविष्ट असलेल्या ८ भागांमध्ये एकूण ९ ठिकाणी शिस्तबद्ध पथसंचलने पार पडली. या सोहळ्यात राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय, प्रांत आणि महानगर अधिकाऱ्यांसह विविध भागांतील कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. या संचलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे बाल, तरुण आणि ज्येष्ठ अशा सर्व वयोगटांतील सेविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. संचलनादरम्यान घोष पथकात वंशी (बासरी), आनक, पणव, झल्लरी आणि त्रिभुज या पारंपरिक वाद्यांवर आकर्षक रचनांचे बहारदार वादन करण्यात आले.
संभाजी भागात प्रथमच एकाच वेळी ३ वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच वारजे-कोंढवे धावडे, बावधन (एलएमडी चौक) आणि शामराव कलमाडी हायस्कूल येथून संचलने संपन्न झाली. तसेच सिंहगड भागात दोन संचलने एकाच वेळी सिंहगड रोड आणि नर्हे परिसरात पार पडली. याशिवाय कसबा, कात्रज आणि पर्वती-यरवडा भागांतही सघोष पथसंचालने अत्यंत उत्साहात पार पडली. पूर्ण गणवेशात शिस्तबद्ध रीतीने मार्गस्थ झालेल्या या सघोष पथसंचलनात तब्बल २५०० सेविका सहभागी झाल्या होत्या. संचलन मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी कमानी उभारून, रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करत सेविकांचे अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केले. दरम्यान, महानगरच्या उर्वरित दोन भागांमध्ये येत्या रविवारी (ता. २५ ऑक्टोबर) सघोष पथसंचालने होणार असून, विद्यापीठ भागात ‘औंध’ येथे आणि लष्कर भागात ‘लोणी काळभोर’ येथे संचलन आयोजित करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पार्श्वभूमीवर झालेला हा स्त्रीशक्तीचा जागर समाजात संघटनभाव आणि देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारा ठरला आहे.















