पुणे(प्रतिनिधी)– पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका नऊ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या पाशवी कृत्यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी गावकऱ्यांमध्ये मिसळून पीडितेचा शोध घेण्याचे ढोंग रचणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
पोलिसांसोबत बसून सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना अतिशहाणपणा दाखवून “बघा बघा, मी सीसीटीव्हीमध्ये दिसतोय,” असे स्वतःच पोलिसांना सांगणे या नराधमाच्या अंगलट आले असून, त्याच्या याच एका चुकीमुळे आणि पोलिसी खाक्यामुळे अवघ्या काही तासांतच या भयंकर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुका आणि पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणातील संशयित नराधम आरोपीचे नाव साहिल खैरे असे असून, तो कामानिमित्त पिंपळवंडी येथे आपल्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी आला होता. बहिणीच्या घराजवळच राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील नऊ वर्षांच्या चिमुरडीशी त्याची ओळख झाली होती. घटनेच्या दिवशी पीडित चिमुरडीला कांजण्या आल्या असल्यामुळे ती शाळेत गेली नव्हती आणि घरी एकटीच होती. तिचे आई-वडील नेहमीप्रमाणे शेतात मजुरीच्या कामासाठी गेले होते. घरात चिमुरडीला एकटे पाहून आरोपी साहिल खैरे याच्या मनात विकृती जागी झाली. त्याने पीडितेला सायकल शिकवण्याचा बहाणा केला आणि तिला सायकलवर बसवून घरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर नेले. तिथे त्याने आपली सायकल रस्त्यावर उभी केली आणि चिमुरडीला ओढा आणि दाट झाडी असलेल्या एका निर्जन उसाच्या शेतात ओढत नेले. या निर्जन ठिकाणी त्याने चिमुरडीवर पाशवी लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह लपवून ठेवला.
दिवसभर शेतात काम करून सायंकाळी आई-वडील घरी परतले असता, त्यांना आपली मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी करत तात्काळ तिची शोधमोहीम सुरू केली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने गावातील नागरिकही मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी मुलीला शोधण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, चिमुरडीचा जीव घेणाऱ्या आरोपी साहिल खैरे याच्या चेहऱ्यावर या भयंकर कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नव्हता. तो अतिशय निर्ढावलेल्या मनाने गावकऱ्यांमध्ये मिसळला आणि स्वतःच मुलीचा शोध घेण्याचे नाटक करू लागले.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून दुपारी साडेचार वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.पोलिस पथकाने साडेपाच वाजेच्या सुमारास गावातील एका घराला बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलीस, गावकरी आणि संशयित आरोपी साहिल खैरे हा देखील पोलिसांच्या शेजारीच स्टूलवर बसून अत्यंत शांतपणे ते फुटेज पाहत होता. फुटेज सुरू असताना अचानक एक व्यक्ती सायकलवरून जात असल्याचे स्क्रीनवर दिसले. ते पाहताच गर्दीत बसलेला साहिल अतिशहाणपणा आणि ऐट दाखवून मोठ्या आवाजात म्हणाला, “बघा, बघा… मी सायकलवरून चाललोय!” त्याने स्वतःहून पोलिसांना दिलेला हाच क्लू त्याच्या विनाशाचे कारण ठरला. पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने साहिलचा हा संशयास्पद अतिशहाणपणा तात्काळ हेरला आणि पोलिसांना तपासाचा पहिला मोठा धागा सापडला.
संशय बळावल्याने पोलिसांनी तात्काळ दुसऱ्या एका ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तीच सायकल अत्यंत वेगाने डाव्या बाजूला वळताना दिसून आली. अंतर थोडे लांब असल्याने त्या फुटेजमध्ये सायकल चालवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. परंतु पोलिसांनी पहिल्या फुटेजमध्ये दिसलेल्या सायकलची रचना आणि मघाशी अतिउत्साहाने बोलणाऱ्या साहिल खैरे याची शरीरयष्टी ताडून पाहिली असता, दोन्हीमध्ये कमालीचे साधर्म्य असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी अधिक वेळ न घालवता साहिलला गाडीत टाकले आणि त्याची कसून उलटतपासणी सुरू केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि “मी सायकलवरून मळ्यात गेलो होतो,” अशी खोटी थाप मारली. मात्र, त्याच वेळी तिथल्या एका जागृत गावकऱ्याने पोलिसी तपासात मदत करत तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले की, जर साहिल खैरे मळ्यात गेला असता, तर तो मळ्याच्या दिशेला असलेल्या दुसऱ्या कॅमेऱ्यात नक्कीच कैद झाला असता; पण तो त्या कॅमेऱ्यात दिसलाच नाही.
गावकऱ्यांनी उघडकीस आणलेल्या या मोठ्या विसंगतीमुळे आरोपीचा खोटेपणा उघड झाला आणि पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवण्यास सुरुवात केली. पोलिसी हिसका बसताच काही वेळातच आरोपी साहिल खैरे पूर्णपणे कोसळला आणि त्याने चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने पोलिसांना थेट घटनास्थळाकडे नेले, जिथे त्याने गुऱ्हाळाच्या शेजारी असलेल्या तागाच्या शेताजवळील एका पाईपखाली चिमुरडीचा मृतदेह लपवून ठेवला होता. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस आणि गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि आरोपीने सीसीटीव्ही फुटेज पाहताना स्वतःहून केलेल्या एका चुकीमुळे या क्रूर आणि विकृत नराधमाचे बिंग अवघ्या काही तासांतच फुटले. अशा विकृत नराधमावर कोणताही दयामाया न दाखवून त्याला थेट फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी अत्यंत आक्रमक मागणी पिंपळवंडी येथील ग्रामस्थ आणि महिलांकडून केली जात आहे.
अत्याचाराच्या निषेधार्थ पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको
चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. आमच्या मुलीला न्याय द्या व आरोपीस फाशीची शिक्षा द्या, अशा घोषणा देत जवळपास दीड ते दोन तास महामार्ग रोखून धरण्यात आला.
पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर येथील संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी संपूर्ण गाव बंद ठेवून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात पिंपळवंडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.













