नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील तणाव आता टोकावर पोहोचला असून अमेरिकेने इराणमधील डझनभर शहरांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. गेल्या चार रात्रींपासून अमेरिकन सैन्य इराणवर सातत्याने बॉम्बवर्षाव करत असून, इराणचे लष्करी तळ, अण्वस्त्र प्रकल्प आणि महत्त्वाच्या बंदरांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती भागात युद्धाचा भडका उडाला असून जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’वर (Strait of Hormuz) पुन्हा एकदा संकट ओढवले आहे.
इराणच्या दक्षिण भागातील बुशेरपासून ते चाबहारपर्यंतच्या किनारपट्टीच्या संपूर्ण भागाला अमेरिकेने प्रामुख्याने लक्ष्य केले आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील खुदाब, बंदर अब्बास आणि चाबहारसह डझनभर शहरांवर हे हल्ले करण्यात आले आहेत. मध्य इराणमधील खुदाब येथे असलेल्या ‘अराक’ अणूभट्टीच्या जवळ मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय खुझस्तान प्रांतातील माशहार येथील पेट्रोकेमिकल प्लांट आणि अहवाझ विमानतळावरही अमेरिकन क्षेपणास्त्रे कोसळली आहेत. इराणच्या नौदलाचे मुख्य मुख्यालय आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवणारे बंदरही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. अमेरिकेने कुवेत येथील आपल्या लष्करी तळावरून ही घातक क्षेपणास्त्रे डागली असून इराणच्या सरकारी मीडियाने दक्षिण इराणमधील सिरिक येथील ताहिरियो गावाजवळ झालेल्या भीषण हल्ल्यांची पुष्टी केली आहे.
अमेरिकन कमांडर-इन-चीफच्या आदेशानुसार इराणच्या लष्करी यंत्रणेला आणि लष्करी तुकड्यांना जबाबदार धरण्यासाठी हे हल्ले करण्यात येत आहेत. विशेषतः हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणकडून होणारी हल्ले करण्याची क्षमता कमकुवत करणे, हा अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा जेव्हा इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढतो, तेव्हा इराण हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देतो किंवा तिथे जहाजांना लक्ष्य करतो. आताही इराणने निर्धारित मार्गाचे उल्लंघन करणाऱ्या आणि ओमानच्या बाजूने जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर गोळीबार सुरू केल्यामुळे अमेरिकेने ही अत्यंत कठोर कारवाई सुरू केली आहे.
या संघर्षामागे केवळ लष्करीच नव्हे तर जागतिक राजकीय कारणेही महत्त्वाची ठरत आहेत. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रतिमेचा आणि धोरणांचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी एक दिवसासाठीही बंद राहिल्यास त्याचा परिणाम केवळ त्या क्षेत्रावरच नव्हे तर संपूर्ण जगावर होतो आणि त्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले जाते. सध्या अमेरिका आणि इस्रायलमधील युद्ध धोरणांमधील मतभेदही समोर येत आहेत, ज्याचा फायदा इराण घेण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान आणि कतार यांसारख्या देशांनी या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु युद्धनीतीमधील गोंधळामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. अमेरिका सध्या इराणवर अशा स्तरावर हल्ले करत आहे की ज्यामुळे इराणला पुन्हा एकदा जुन्या करारांचे पालन करण्यास भाग पाडले जाईल, मात्र सध्यातरी हे युद्ध थांबण्याऐवजी अधिकच चिघळताना दिसत आहे.















