सासवड-जेजुरी मार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात: ४ वारकऱ्यांचा मृत्यू, माऊलींच्या वारीला गालबोट

सासवड-जेजुरी वारी अपघात (Saswad-Jejuri Wari Accident)
सासवड-जेजुरी वारी अपघात (Saswad-Jejuri Wari Accident)

सासवड-जेजुरी: आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने भीषण घाला घातला आहे.  सासवड-जेजुरी मार्गावर बेलसर टोल नाक्याजवळ हॉटेल शिवदीप लॉजिंगसमोर झालेल्या एका दुर्दैवी रस्ता अपघातात चार वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबीसकर यांच्या दिंडीतील एक ट्रक भाविकांना घेऊन जात होता. या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो थेट वारकऱ्यांच्या रांगेत घुसला आणि सांगली जिल्ह्यातील कसबेदिग्रज येथील दिंडीतील सात महिला वारकऱ्यांना या ट्रकने जोरदार धडक दिली. सुरुवातीच्या माहितीनुसार तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र ताज्या अपडेट्सनुसार या भीषण अपघातात आतापर्यंत ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा  प्रार्थना पद्धती वेगळी असली तरी धर्म व देशाप्रती भाव हवा : संत संमेलनात उमटला सूर

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सकाळी सासवडवरून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली असतानाच, सासवड-जेजुरी रस्त्यावर बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेला सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल शिवदीप लॉजिंगसमोर हा अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. ज्यामुळे वारीच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे.

मृत्युमुखी पडलेल्या तीन महिलांची ओळख पटली असून त्यांची नावे राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार अशी आहेत. या तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील रहिवासी होत्या. या अपघातात इतर ५ ते ६ वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जेजुरी येथील आयसीयू (ICU) रुग्णालयात आणि काही जणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशासकीय ढिसाळपणावर टीकेची झोड

या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियोजनावर आणि ढिसाळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पालखी मार्गावर लाखो वारकरी चालत असताना आणि ४० ते ५० हजार वाहने दिंडी प्रमुखांसोबत जात असताना, वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी दिवे घाटात झालेल्या ६ तासांच्या वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. जर पोलिसांनी वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका किंवा वेळेचे बंधन घातले असते, तर हा अपघात टाळता आला असता, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे. एका दिंडीसोबत सरासरी ५ ते ६ गाड्या असतात, मात्र या गाड्यांच्या वेगावर आणि हालचालींवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे.

अधिक वाचा  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पोलीस तपास आणि पुढील कार्यवाही घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सध्या तिथे पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आळंदी आणि देहू देवस्थानचे विश्वस्त तसेच दिंडी प्रमुखांनी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर आचारसंहिता पाळणे बंधनकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love