पुणे(प्रतिनिधी)- उद्योगनगरीतील मोशी येथील कचरा डेपोमधील कचऱ्याचा अवाढव्य डोंगर जवळच असलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने ही दुमजली आरसीसी इमारत खचली असून, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत सुमारे 15 ते 20 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत असून, यातील चौघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांत सुमारे 500 ते 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा मोठा साठा अस्थिर झाला आणि तो साधारण 30 मीटर अंतरावर असलेल्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. दुर्घटना घडली, ती दुपारच्या जेवणाची वेळ होती. त्यामुळे अनेक कर्मचारी इमारतीमधील पॅन्टीनमध्ये आणि कार्यालयात उपस्थित होते. इमारतीचा पाया खचल्याने खालच्या मजल्यावर असलेले 15 कर्मचारी ढिगाऱ्याखाली गाडले गेले, तर वरच्या मजल्यावरील 4 ते 5 जण नशिब बलवत्तर म्हणून सुरक्षितपणे बाहेर पडले.
मदतकार्य सुरू; लष्कराला पाचारण
या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेचे गांभीर्य आणि ढिगाऱ्याचे प्रचंड प्रमाण लक्षात घेऊन एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तर लष्कराची तुकडीही मदतीसाठी तातडीने दाखल झाली आहे. घटनास्थळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे आणि महापौर रवी लांडगे स्वत: उपस्थित राहून बचाव कार्याचे बारकाईने निरीक्षण करत होते. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सुमारे 15 ते 16 कर्मचाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित झाला असून त्यांचे आवाज ऐकू येत आहेत. हे कर्मचारी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्याने बचाव पथकांचा हुरूप वाढला आहे.
सध्या बचाव कार्यात कचऱ्याचा मोठा ढिगारा ही मुख्य अडचण ठरत आहे. इमारतीवर साचलेला हा कचरा वेगाने बाजूला केल्याशिवाय अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. हे आव्हान पेलण्यासाठी तीन जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने कचरा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांशी सातत्याने संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने, रात्री उशिरापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. घटनास्थळी अनेक वैद्यकीय पथके आणि ऊग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून, ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर कर्मचाऱ्यांवर तात्काळ उपचार करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून, एनडीआरएफ, लष्कर आणि अग्निशमन दलाकडून अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.













