राम मंदिर दान चोरी प्रकरण: चंपत राय यांचा खळबळजनक गौप्यस्फोट; स्टेट बँक आणि अनिल मिश्रांवर थेट आरोप

राम मंदिर दान चोरी चंपत राय खुलासा
राम मंदिर दान चोरी चंपत राय खुलासा

अयोध्या: अयोध्येतील ऐतिहासिक आणि भव्य राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीच्या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणावरून ट्रस्टच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेल्या चंपत राय यांनी पहिल्यांदाच मौन सोडत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या दान चोरीसाठी थेट स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांना जबाबदार धरले आहे. विशेष तपास पथकाला (SIT) पाठवलेल्या एका पत्रात त्यांनी या संपूर्ण प्रकरणामागील धक्कादायक बाबींचा उलगडा केला असून, दान मोजणी प्रक्रियेत जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे.

चंपत राय यांनी एसआयटीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्टेट बँकेसोबत दान मोजणीसाठी एक नवीन करार (SOP) करण्यात आला होता. या कराराची त्यांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. २०२० पासून ट्रस्टने केलेल्या प्रत्येक सामंजस्य करारावर (MoU) चंपत राय यांच्या स्वाक्षऱ्या होत्या, मात्र या विशिष्ट करारावर त्यांची स्वाक्षरी नसून त्यावर डॉ. अनिल मिश्रा आणि बँकेचे मुख्य व्यवस्थापक गोविंद मिश्रा यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे समोर आले आहे. आपल्याला या कराराची माहिती थेट १३ जून २०२६ रोजी मिळाली, ज्यामुळे आपल्या अनुपस्थितीत आणि परस्पर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते, असे राय यांनी पत्रात नमूद केले आहे.

अधिक वाचा  मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान

स्टेट बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना चंपत राय यांनी म्हटले की, दान मोजणीसारख्या अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील कामासाठी बँकेने हाऊसकीपिंग स्टाफ अर्थात स्वच्छता कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे हीच मूळ चूक होती. बँकेने स्वतःहून मोजणीचे नियम बदलले, ज्यामुळे चोरीच्या घटनांना वाव मिळाला. पूर्वी दान मोजणी करताना कर्मचाऱ्यांची कडक झडती घेतली जात असे, परंतु नवीन नियमांमुळे ही प्रक्रिया बंद करण्यात आली. इतकेच नाही तर, मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खिसे असलेले कपडे वापरण्याची परवानगी देण्यात आली आणि जमिनीवर बसून मोजणी करण्याऐवजी खुर्ची-टेबलवर बसून ही प्रक्रिया पार पडली, परिणामी नोटा चोरणे सोपे झाले. सप्टेंबर २०२४ च्या मूळ करारात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा गेट यांसारख्या कठोर तरतुदी होत्या, मात्र बँकेने या सुरक्षा नियमांचे पालन केले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

अधिक वाचा  12 वीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९०.६६ टक्के-यंदाही मुलींचीच बाजी

दरम्यान, स्वतःच्या बचावासाठी चंपत राय यांनी रामभक्तांच्या नावे एक दहा ओळींचे हस्तलिखित पत्र जारी केले आहे. गेल्या ४५ वर्षांपासून आपण प्रचारक म्हणून कार्यरत असून आपले जीवन उघड्या पुस्तकासारखे असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. सध्या आपल्यावर लावलेले आरोप निराधार असून तपासात व्यत्यय येऊ नये म्हणून आपण ‘मौन’ धारण करत आहोत. एसआयटीचा अंतिम अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक आरोपाचे पुराव्यासह उत्तर देऊ आणि सत्य जनतेसमोर आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, राम मंदिर ट्रस्टने चंपत राय यांना चोरीमध्ये थेट सहभागी मानले नसले तरी, सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडून झालेल्या ‘कर्तव्यातील निष्काळजीपणा’बद्दल त्यांना दोषी ठरवून त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी आणि स्वामी परमानंद यांनी चंपत राय यांच्या चारित्र्यावर संशय नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, आपल्या सहकाऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवणे ही त्यांची मोठी चूक ठरली, असे मत व्यक्त केले आहे. सध्या मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कृष्ण मोहन यांच्याकडे सोपवण्यात आली असून, एसआयटीच्या अंतिम अहवालात आणखी कोणाकोणाची नावे समोर येतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love