नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण: नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; अवघ्या ५५ दिवसांत पुण्याच्या सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण
नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण

पुणे(प्रतिनिधी)–संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुण्याच्या सत्र न्यायालयाने सोमवारी( दि. २९ जून) ऐतिहासिक निकाल दिला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी या प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळे याला ‘मरेपर्यंत फाशी’ (Hang till death) ची शिक्षा सुनावली आहे. अवघ्या ५५ दिवसांत लागलेला हा निकाल राज्याच्या कायदेशीर इतिहासातील सर्वात वेगवान खटल्यांपैकी एक ठरला असून, पीडितेला अखेर न्याय मिळाला आहे.

ही हृदयद्रावक घटना १ मे रोजी महाराष्ट्र दिनी घडली होती. आरोपी भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून गोठ्यात नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिची दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. शवविच्छेदन अहवालात चिमुरडीच्या शरीरावर तब्बल १८ गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास करत २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आणि केवळ १४ ते १६ दिवसांत १२०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

अधिक वाचा  केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट : हत्येच्या कटाची माहिती असलेला तिसरा तरुण ताब्यात : सिया गोयलची मुजोरी कायम

न्यायालयाने हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) श्रेणीत मोडणारा असल्याचे स्पष्ट केले. निकाल देताना न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, आरोपीने अत्यंत नियोजित पद्धतीने आणि क्रूरतेची परिसीमा ओलांडून हे कृत्य केले आहे. या खटल्यात पोलिसांनी ५५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते आणि सीसीटीव्ही फुटेजसह भक्कम तांत्रिक पुरावे सादर केले होते. न्यायालयाने निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या ‘बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य’ आणि ‘निर्भया’ प्रकरणासह १२ महत्त्वाच्या खटल्यांच्या निकालांचा दाखला दिला.

न्यायाधीशही गहिवरले

न्यायाधीशांनी आपल्या निरीक्षणात नमूद केले की, आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने केलेले कृत्य इतके अमानुष आहे की वयाचा विचार करून त्याला दया दाखवता येणार नाही. आरोपीला बलात्कार, खून आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे, निकाल वाचताना या घटनेच्या भीषणतेमुळे स्वतः न्यायाधीशही काही काळ गहिवरले होते आणि त्यांनी पाण्याचे दोन घोट घेऊन स्वतःला सावरत निकाल वाचन पूर्ण केले.

अधिक वाचा  मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण दुर्घटना – डंपर घरावर पलटला, दोन महिलांचा मृत्यू

या निकालाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. मनिषा कायंदे, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांसारख्या नेत्यांनी पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेचे अभिनंदन केले असून, हा निकाल अशा विकृत मानसिकतेच्या लोकांसाठी मोठा इशारा असल्याचे म्हटले आहे. आरोपीच्या पत्नीने आणि मुलांनीही आधीच त्याची साथ सोडली असून, त्याला कठोर शिक्षा व्हावी अशीच त्यांचीही भूमिका होती. निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर पीडितेच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. या निकालामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून, महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love