…तर पद्मश्री परत करू : ‘समरसता संमेलना’त रघुवीर खेडेकर यांचा इशारा

समरसता लोककला संमेलन रघुवीर खेडकर
समरसता लोककला संमेलन रघुवीर खेडकर

पुणे(प्रतिनिधी)–समाजात समरसता वृद्धिंगत करण्याच्या कामात लोककलावंतांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने समरसता लोककला संमेलन आयोजित करण्याचा उपक्रम उल्लेखनीय आहे. मात्र, लोककलावंत अद्यापही उपेक्षितांचे जगणे जगत असून, त्यांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी पहिल्या समरसता लोककला संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री रघुवीर खेडेकर यांनी  येथे केली. मुख्यमंत्री व सहकारीमंत्र्यांनी लोककलावंतांची कैफियत ऐकून घेतली पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा संमेलन आयोजित करावे. अन्यथा, आपण पद्मश्री परत करू, असा इशाराही त्यांनी दिला.

लोककलावंतांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचाव्या, लोककलावंतांमध्ये विचारांचे आदान-प्रदान व्हावे व विविध लोककलांचा रसिकांना परिचय व्हावा, या दृष्टीने राज्याचा सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि समरसता साहित्य परिषद यांच्या वतीने या वर्षापासून ‘समरसता लोककला संमेलन’ आयोजित करण्यात येत आहे. या पहिल्या संमेलनात ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी नर्तिका मधू कांबीकर यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्या अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या भगिनी रत्ना कांबीकर यांनी पुरस्कार स्वीकारला. मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आलेगावकर, लोककलावंत नंदेश उमप, पद्मश्री वितहाबाई नारायनगावकर यांच्या कन्या मंगला बनसोडे, लीला गांधी, जयमाला इनामदार, सुरेखा पुणेकर, छाया आणि माया खुतेगावकर, राधा खुडे, बिग बॉस फेम अहिराणी गायक सचिन कुमावत, नृत्यांगना वैशाली जाधव, रेश्मा मुसळे, अनिल मोरे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या जान्हवी जानकर, वारकरी परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ गराडकर,  भाजप शहराध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष धीरज घाटे, संमेलनाचे आयोजक धनंजय खुडे, नीलेश गद्रे, डॉ. प्रसन्न पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  ‘दोषी मीच या समाजाचा, तूच मार्ग दाखव आता’:भजन-अभंग गायनात बंदीजन तल्लीन

लोक कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून शतकानुशतके प्रबोधनाचे, सांस्कृतिक आदान प्रदानाचे आणि सलोखा निर्माण करण्याचे कार्य परंपरेने करीत आहेत. मात्र, लोक कलावंतांचे स्वत:चे जगणे अजूनही आव्हानात्मक स्वरूपाचे आहे, याकडे लक्ष वेधून खेडेकर म्हणाले, की शासनाच्या लोककलावंतांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोककलावंत निश्चितपणे पुढे येतील. मात्र, लोककलावंतांकडे आजही गावकुसाबाहेर असल्याप्रमाणे बघितले जाते. आपली कला सादर करण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या कलावंतांना प्रस्थापितांकडून अन्याय सहन करावा लागतो. स्थानिक पोलिस आणि प्रशासनदेखील कलावंतांच्या तक्रारींची दखल न घेता प्रस्थापितांची पाठराखण करतात. हे सर्व आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या कानावर घालायचे होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीने आमची निराशा झाली, अशी नाराजीही खेडेकर यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  महाराष्ट्रातील तमाशा फड, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, नाट्य क्षेत्रातील कलाकार बेमुदत उपोषणास बसणार - रघुवीर खेडकर

 …तर पद्मश्री परत करू

या लोककला संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते, तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अन्य मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, अचानक उद्भवलेल्या अन्य कार्यक्रमामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. याबद्दल खेडेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लोककलावंतांच्या पदरी आजही उपेक्षाच पडत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री पाच वर्ष त्यांच्या पदावर राहणार आहेत. त्यांना नेहमीच दिवस-रात्र काम असणार आहे. मात्र, डोके कलावंतांकडून अपेक्षा व्यक्त करताना त्यांची कैफियत ऐकून घेणे, हेदेखील त्यांचे कामच आहे. यापुढील एक महिन्याच्या कालावधीत पुन्हा एकदा अशाच संमेलनाचे आयोजन मुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले नाही, तर आपण आपला पद्मश्री पुरस्कारही परत करू, असा इशारा खेडेकर यांनी या वेळी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love