पुणे(प्रतिनिधी)–हिंजवडीतील टीसीएस या आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने कंपनीतील दोन महिला कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. टीसीएस कंपनीतील या घटनेने पुन्हा एकदा आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सततचा मानसिक छळ, खोट्या तक्रारी आणि कामाच्या ठिकाणी होणारा अपमान यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख संबंधित कर्मचाऱ्याने सुसाइड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी एका व्यक्तीसह टीसीएसमधील दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित अभय ब्रह्मे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विनोद जेठालाल पालीचा तसेच हिंजवडीतील टीसीएस कंपनीतील अर्चना आणि शाश्वती या दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित यांचा मुलगा अनिश अमित ब्रह्मे (वय १९, रा. भोसरी) याने मंगळवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांनी याबाबत माहिती दिली. अमित ब्रह्मे हे हिंजवडी येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीत कार्यरत होते. त्यांनी २ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही व्यक्तींमुळे होत असलेल्या मानसिक त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
टीसीएसच्या डीईजी प्रकल्पात कार्यरत असलेल्या अर्चना आणि शाश्वती या महिला कर्मचाऱ्यांकडून अमित ब्रह्मे यांना सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यांच्या हातातील महत्त्वाचे प्रकल्प काढून घेणे, अपरिचित कामे सोपविणे, सर्वांसमोर अपमान करणे, नोकरी सोडण्याचा सल्ला देणे तसेच कामाबाबत नकारात्मक अभिप्राय देण्याची धमकी देणे, अशा प्रकारे त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात येत होता. अमित यांची पत्नी असाध्य आजाराने त्रस्त असल्याने तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अमित ब्रह्मे आधीच तणावाखाली होते. त्यातच सातत्याने होणारा मानसिक छळ, बदनामी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक यामुळे ते नैराश्यात गेले होते. अखेर या सर्व प्रकारांना कंटाळून त्यांनी २ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
गैरसमजातून वादातून खोटे गुन्हे दाखल
आरोपी विनोद पालीचा याच्या पत्नीची आणि अमित यांच्या पत्नीची फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये परिचय निर्माण झाला. दरम्यान, कौटुंबिक वादातून पालीचा याची पत्नी परदेशात फिलिपिन्स येथे निघून गेली. ब्रम्हे दांपत्याने फितवल्यानेच आपली पत्नी परदेशात निघून गेल्याचा पालीचा याचा समज झाला. हा राग मनात धरून पालीचा याने अमित ब्रह्मे यांच्या विरोधत चोरी व फसवणुकीच्या खोट्या तक्रारी केल्या. तसेच, वकिलामार्फत नोटिसा पाठविणे, कंपनीच्या अधिकृत ई-मेलवर बदनामीकारक संदेश पाठविणे अशा प्रकारे त्यांना मानसिक त्रास दिला, असा आरोप अमित यांच्या मुलाने फिर्यादीत केला आहे. कंपनीतील दोन महिलांकडून होत असलेला छळ आणि विनोद पालीचा याच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळेच आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे अमित ब्रह्मे यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केल्याचे अनिश याने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक केतन मांजरे तपास करीत आहेत.













