चितळे बंधू आता ‘ग्लोबल ब्रँड’; व्हिजन पार्कच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

चितळे बंधू व्हिजन पार्क उद्घाटन
चितळे बंधू व्हिजन पार्क उद्घाटन

पुणे: “चितळे बंधू हा आता केवळ महाराष्ट्राचा राहिला नसून तो एक खऱ्या अर्थाने ग्लोबल ब्रँड झाला आहे. ज्या पद्धतीने या कुटुंबाने आपल्या चार पिढ्यांचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे, ते पाहता येणाऱ्या काळात परदेशातील नागरिकही चितळेंचे पदार्थ घेण्यासाठी रांगा लावतील, असा मला ठाम विश्वास आहे,” असे गौरवद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ‘व्हिजन पार्क’ या अत्याधुनिक सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री. गोविंद चितळे, श्री. श्रीकृष्ण चितळे, श्री. केदार चितळे यांच्यासह राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला फडणवीस यांनी ‘व्हिजन पार्क’मधील गॅलरीची पाहणी केली. चितळे बंधूंची ही नवी फॅसिलिटी म्हणजे केवळ एक कारखाना नसून ते एक ‘व्हिजन’ आहे, असे त्यांनी नमूद केले. एकेकाळी ‘आमची कुठेही शाखा नाही’ इथपासून झालेली सुरुवात आज ३५ देशांपर्यंत पोहोचली आहे आणि लवकरच हा ब्रँड जगातील उर्वरित देशांमध्येही विस्तारणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी फडणवीस यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. नागपूरला जाताना महाराष्ट्र एक्सप्रेसमधील प्रवासासाठी काकू मुद्दाम बाकरवडीची दोन पाकिटे द्यायच्या, जेणेकरून एक वाटेत संपले तरी दुसरे घरी पोहोचेल, ही आठवण सांगताना त्यांनी चितळेंच्या चवीचे गारूड आजही कायम असल्याचे स्पष्ट केले.

अधिक वाचा  सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' टीकेवरून राष्ट्रवादीची काँग्रेस भवनवर धडक

‘व्हिजन पार्क’च्या तांत्रिक वैशिष्ट्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, ही फॅक्टरी ‘स्टेट ऑफ आर्ट’ स्वरूपाची असून येथे उत्पादनाच्या प्रक्रियेत कुठेही मानवी हस्तक्षेप (नो ह्युमन इंटरव्हेंशन) होत नाही. यामुळे पदार्थांची शुद्धता आणि सॅनिटायझेशन अत्यंत उच्च दर्जाचे राखले जाते. विशेष म्हणजे, सध्याच्या काळात आरोग्य आणि गुणवत्तेचा विचार करता, अनेक स्पर्धक स्वस्त पाम ऑइलचा वापर करत असताना चितळे यांनी मात्र शेंगदाणा तेलाचा वापर सुरू ठेवला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. या प्रकल्पात उभारण्यात आलेली ‘व्ह्यूइंग गॅलरी’ ही पारदर्शकता जपण्याचे मोठे साधन असून, जर्मनीतील ऑडी कार फॅक्टरीप्रमाणेच येथेही ग्राहक किंवा विद्यार्थी उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया डोळ्यांनी पाहू शकतात, ज्यामुळे एक प्रकारची ‘इंडस्ट्रियल टूर’ अनुभवता येईल.

भारतीय खाद्यसंस्कृती ही आपली ‘सॉफ्ट पॉवर’ असल्याचे नमूद करत फडणवीस यांनी सांगितले की, जगात आता भारतीय भोजनाचा आस्वाद केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकही मोठ्या आवडीने घेत आहेत. परदेशातून आलेल्या मशिनरीमध्ये स्वतःच्या अनुभवातून बदल करून, बाकरवडीसारख्या अस्सल मराठी पदार्थासाठी त्या कशा प्रकारे पूरक ठरतील, हे ‘इनोव्हेशन’ चितळे बंधूंनी यशस्वीपणे साध्य केले आहे. तसेच, या प्रकल्पात नूतनीकरणक्षम ऊर्जेचा (रिन्यूएबल पॉवर) वापर होत असल्यामुळे जागतिक बाजारात या उत्पादनांना अधिक मागणी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  Sunetra Pawar : 'दादां'चा वारसा आता 'वहिनीं'च्या हाती! सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री; राजभवनात शपथविधी संपन्न

शेवटी, निर्यातक्षम अन्न उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. कोल्हापूरचे भडक आणि मुंबईचा चिवडा यांसारखे प्रादेशिक पदार्थही आता या आधुनिक सुविधेद्वारे जागतिक स्तरावर पोहोचत आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत त्यांनी चितळे परिवाराचे अभिनंदन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love