समाजकार्याचे यशस्वी प्रयोग समाजव्यापी व्हावेत – अतुल लिमये ; जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

Janakalyan samiti shri guruji puraskar
Janakalyan samiti shri guruji puraskar

पुणे(प्रतिनिधी)– “समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे. तसे झाल्यास अशा प्रयोगांतूनच खऱ्या अर्थाने व्यवस्था परिवर्तन घडून येईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी शनिवारी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे आयोजित ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात संशोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार दादा लाड यांना, तर समाजप्रबोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यवाह राजन गोऱ्हे यांनी स्वागत केले.

अधिक वाचा  जागतिक शांतीसाठी 'हिंदू प्रारूप' विकसित करणार : शरदराव ढोले : रा. स्व. संघाच्या प्रांतिक समन्वय बैठकीत शताब्दी वर्षाचे नियोजन

अतुल लिमये म्हणाले, “समाजाचे शासनावरील अवलंबित्व वाढत चालले असून, यामुळे समाज अपंग बनण्याची भीती आहे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी समाज बदलवणाऱ्या यशस्वी प्रयोगांचा अनुकरणीय आराखडा तयार करून आदर्श कार्यप्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. विकसित भारताच्या दिशेने जाण्यासाठी हे कार्य अनिवार्य आहे.”

“आजकाल अनेक लोक हिंदुत्वाबद्दल मनात कटुता बाळगून असल्याचे चित्र दिसत आहे,” असे मत अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “भारतातील बौद्ध, जैन, शीख आणि वैदिक यांची एकत्रित परंपरा म्हणजेच हिंदुत्व होय. हिंदू धर्म ही एक जीवनपद्धती आणि विचारधारा असून, तिला प्रत्यक्ष कृतीत आणण्याची प्रक्रिया म्हणजे हिंदुत्व होय. जनकल्याण समिती समाजाच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या लोकांना संघटित आणि कार्यान्वित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.”  “मूल्यांची समज म्हणजेच धर्म होय. जोपर्यंत आजची पिढी नैतिक मूल्यांची कास धरून चालेल, तोपर्यंत धर्म अबाधित राहील,” असेही फिरोदिया यांनी नमूद केले.

अधिक वाचा  हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश : आम्ही कुणालीही आमच्या मुली देत नाहीत : का म्हणाले असे शरद पवार?

भारतभूषण महाराज म्हणाले, “सनातन परंपरा आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. समाजाला वैभवशाली बनविण्यासाठी व्यावहारिक कार्याबरोबरच आत्मिक शांतीसाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूल्यमापन बाहेर राहून करता येणार नाही, त्यासाठी संघात प्रत्यक्ष सहभागी व्हावे लागेल.

दादा लाड यांनी कापूस हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे नव्हे, तर वैभवाचे पीक असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “विदर्भातील आत्महत्यांना दुर्दैवाने कापूस पिकाशी जोडले गेले. वास्तव पाहता, संपूर्ण जगाला कापडाची देणगी देणाऱ्या भारताचे कापूस हे मुख्य नगदी पीक आहे. कापसाचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर बोंडाचे वजन वाढणे गरजेचे आहे. मी कापूस पिकाची ‘गळफांदी’ काढून ‘फळफांदी’ लांबवण्याचे तंत्र विकसित केले. यामुळे कापसाच्या एका बोंडाचे वजन १० ग्रॅमपर्यंत वाढले आणि पर्यायाने एकरी उत्पन्न ४ ते ५ क्विंटलवरून थेट १५ क्विंटलपर्यंत पोहोचले.”

अधिक वाचा  डॉ. लक्ष्मण कार्ले यांच्या वतीने आयोजित नेत्रचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिंचवडच्या पूर्वांचल छात्रावासमधील विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. सेवा भारती संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव प्रदीप सबनीस यांनी आभार प्रदशर्न आणि प्रा. डॉ. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

 एक कोटींची देणगी   

जनकल्याणाच्या कामाला प्रोत्साहन देणे मदत करणे, असे महत्त्वपूर्ण काम जनकल्याण समिती करत आहे. समाजाच्या उत्कर्षाचे हे फार मोठे साधन आहे, अशा शब्दात जनकल्याण समितीच्या कार्याचा गौरव डॉ. अभय फिरोदिया यांनी केला आणी या कार्यासाठी  एक कोटी रुपयांची देणगी देत असल्याचे जाहीर केले.

 

 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love