पुणे(प्रतिनिधी)– शहर गुन्हेगारीमुक्त करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत असताना, पुणे महापालिका (PMC) निवडणुकीत प्रत्यक्षात मात्र प्रमुख राजकीय पक्षांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना रिंगणात उतरवण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक उमेदवारांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना एबी फॉर्म (AB Form) देऊन खळबळ उडवून दिलेली असतानाच भाजपनेही त्यांचा कित्ता गिरवत कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) यांची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपवर टीकेची झोड उठली आहे.
राष्ट्रवादीने गजानन मारणे (Gajanan Marne) यांची पत्नी जयश्री मारणे (Jayashree Marne) यांना उमेदवारी देऊन या वादाची सुरुवात केली होती. त्याशिवाय, आयुष कोमकर (Ayush Komkar) हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या बंडू आंदेकर (Bandu Andekar) यांच्या कुटुंबातील सोनाली आंदेकर (Sonali Andekar) आणि लक्ष्मी आंदेकर (Laxmi Andekar), तसेच कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार नायर (Bapu alias Kumar Nair) यांनाही राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बापू नायर (Bapu Nair) हा शिवसेनेच्या दीपक मारटकर (Deepak Maratkar) हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असून, राष्ट्रवादीने पिंटू धावडे (Pintu Dhawade) आणि रोहीदास चोरगे (Rohidas Chorge) यांसारख्या इतर नावांनाही रिंगणात उतरवले आहे.
भाजपने प्रभाग क्रमांक ११ मधून स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. स्वाती मोहोळ (Swati Mohol) या कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) यांच्या पत्नी आहेत. शरद मोहोळ (Sharad Mohol) यांची गेल्या वर्षी टोळीयुद्धातून राहत्या घराजवळच हत्या झाली होती, त्यानंतर भाजपने त्यांच्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी रामबाग कॉलनी आणि शिवतीर्थनगर परिसरातून भाजपच्या तिकिटावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी २०२३ मध्येच मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता, ज्यावरून त्यावेळीही विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
राजकीय पक्षांच्या या निर्णयांमुळे सोशल मीडियावर संतापाची तीव्र लाट उसळली आहे. कडक शिस्त आणि सुसंस्कृत राजकारणाचा दावा करणाऱ्या भाजपनेही राष्ट्रवादीच्याच पावलावर पाऊल ठेवल्याने सामान्य मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना अशा प्रकारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना राजकारणात आणल्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
















