जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावले : क्रेनच्या ट्रॉलीमध्ये झाला बिघाड

जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावले
जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावले

पुणे(प्रतिनिधि)–राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचा शिवनेरी येथून प्रारंभ झाला. दरम्यान, किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. मात्र, सुदैवाने ट्रॉलीमध्ये असणारे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख हे थोडक्यात बचावले. अमोल कोल्हे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेत महायुतीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) राज्यभरात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरूवात केली आहे. आज राज्यात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. ही यात्रा आज (शुक्रवारी) शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. यात्रेत महायुतीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे.

अधिक वाचा  Prashant Jagtap Resignation : पुणे राष्ट्रवादीत खळबळ: शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा तडकाफडकी राजीनामा

शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख ही सर्वे नेतेमंडळी क्रेनला असलेल्या ट्रॉलीच्या सहाय्याने वर चढले होते. हार घालून खाली येताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाल्याने जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांचा तोल गेला. त्यात जयंत पाटील, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख सुखरूप असून अमोल कोल्हे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे एकच धावपळ उडाली होती. ट्रॉलीचा नट निसटल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पहिल्या टप्प्यात शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून जाणार

पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून फिरणार आहे. त्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाईल. ९  ऑगस्ट हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे, या दिवशीच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘चले जाओ’ चळवळीचा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच जागतिक आदिवासी दिवस असल्याने ९ ऑगस्टची निवड केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

अधिक वाचा  एमपीएससी परीक्षेचा प्रश्न हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग कमी पडला - अजित पवार

शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणेंनी घेतली जयंत पाटलांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार शरद सोनवणेंनी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची  भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला. शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात झाली आहे. जुन्नरमधील सभेनंतर जयंत पाटील हे दुपारच्या भोजनासाठी जय हिंद महाविद्यालयात थांबले होते. तिथं सोनवणेंनी हजेरी लावत जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख तसेच खासदार अमोल कोल्हेंसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. दरम्यान, त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्याच महिन्यात अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सोनवणेंनी तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार : 29 व 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या 6 सभांचे आयोजन 

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love