पुणे : वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागलेल्या पांडुरंग रायकर यांच्या मृत्युनंतर पुण्यातील जम्बो हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर, प्रशासनावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुमुख्य्मंत्री अजित पवार यांनीही तातडीची बैठक घेवून बदल करण्याच्या सूचना केल्यानंतर जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसल्याचे चित्र आहे. जम्बो कोविड सेंटरमधील कामकाज पुणे महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतले असून रविवारी ऑक्सिजनवर असलेला कोरोनाचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तर व्हेंटीलेटरवर असलेल्या दोन रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आल्याचे महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
१०० कोटी रुपये खर्च करून आणि मोठा गाजावाजा करून घाईने सुरु करण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते. आठ दिवसात येथे ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यातच पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर टीकेची झोड उठली. ज्या एजन्सीला येथील व्यवस्थापन देण्यात आले होते. त्या एजन्सीकडून काम काध्य्न घेण्यात आले. आता पुणे महापालिकेने येथील कामकाज ताब्यात घेतले आहे.
अगरवाल म्हणाल्या, येत्या दोन-तीन दिवसात आणखी सुधारणा केल्या जाणार आहेत. यासोबतच रुग्णालयातील स्वच्छता विषयक कामांमध्येही विशेष लक्ष घालण्यात आले आहे. सर्व कामावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून कर्मचा-यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. लाईफलाईन या संस्थेकडून उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचे तसेच रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आरोप झाले. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर टिकेची झोड उठली. त्यानंतर, जम्बोसाठी समन्वय समिती गठित करण्यात आली.
महापालिकेने जम्बोची सर्व सुत्र ताब्यात घेतल्यानंतर ५० डॉक्टर्स आणि १२० वैद्यकीय कर्मचा-यांचे मनुष्यबळ जम्बोमध्ये पुरविले. येथील व्यवस्थेतील त्रुटी सुधारुन रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत याकरिता प्रयत्न करण्यात येत असल्याचे अगरवाल म्हणाल्या.
रुग्णांना दिले जाते पाचवेळा जेवण
रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी मागील आठवड्याभरात आल्या. त्यामुळे पालिकेने आता जम्बो रुग्णालयामध्ये दिवसामधून पाच वेळा जेवण देण्यास सुरुवात केली आहे. हे जेवण दर्जेदार असावे आणि त्यामधून पोषणतत्व मिळावीत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
बाऊन्सर्स हटविले
रुग्णांची माहिती घेण्यासाठी जाणा-या नातेवाईक तसेच माध्यमकर्मींना गेटवरच अडविले जात होते. जम्बोच्या प्रवेशद्वारावर नेमण्यात आलेले ‘बाऊन्सर्स’ अरेरावी करीत होते. मनसेच्या महिला अध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी तर गेटवरुन चढून जाऊन आंदोलन केले होते. यामध्ये महापालिकेने लक्ष घालत सुरक्षारक्षक नेमले आहेत. बाऊन्सर्स हटविण्यात आले आहेत.
व्हिडीओ कॉलवरुन रुग्ण साधू शकणार नातेवाईकांशी संवाद
रुग्णांसोबत बोलता येत नाही, त्यांची स्थिती कळत नाही अशा तक्रारी होत्या. रुग्णांची स्थिती नातेवाईकांना समजावी तसेच त्यांना थेट बोलता यावे याकरिता पालिकेने व्हिडीओ कॉलिंगची व्यवस्था केली आहे. त्याकरिता दोन टॅब खरेदी करण्यात आले आहेत. या टॅबवरुन व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट नातेवाईकांशी रुग्णांचा संवाद घडवून आणला जाणार आहे.
नातेवाईकांसाठी प्रतीक्षा कक्ष
रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी प्रतिक्षा कक्ष व मदत कक्ष उभारण्यात आला असून त्यांना चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी दिवसातून तीनवेळा रुग्णांची माहिती दिली जाणार आहे.