मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पोलीस निरीक्षकाने सहा जणांना ठोकरले ; एकाचा मृत्यू ५ जखमी

क्राईम
Spread the love

पुणे–पोलीस दलातून पोलीस निरीक्षक म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना ताबा सुटल्याने भीषण अपघात घडला. भरधाव वेगात जाणारी ही गाडी थेट एका दुकानात शिरली आणि तिथे उभे असलेल्या सहा जणांना ठोकरले. त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तसेच पाच जण जखमी झाले.  बालेवाडीतील ममता चौकात हा अपघात झाला.

या अपघातात संतोष बन्सी राठोड (वय ३५ ) या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर राजेश सर्वेश सिंग, यशवंत भाऊसाहेब भांडवलकर, दशरथ बबन माने, छोटू आणि सलमान लाल तांबोळी हे पाच जण जखमी झाले आहेत.

चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी कार चालक संजय वामनराव निकम (वय ५८ ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पुणे पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय निकम हा मद्यधुंद अवस्थेत पोलो कार घेऊन बालेवाडी च्या दिशेने जात होता. बालेवाडीतील ममता चौकात त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पंक्चरच्या दुकानात घुसली. यावेळी पंक्चरच्या दुकानासमोर उभ्या असणाऱ्या सहा जणांना या गाडीने जोराची धडक दिली. त्यातील एकाचा जागेवरच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. नागरिकांनी अपघातग्रस्त कारची पाहणी केली असता त्यात दारूच्या बाटल्या आढळल्या. चालकही मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने यानंतर चालक संजय निकम याला बेदम मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याची जमावाच्या तावडीतून सुटका केली आणि ताब्यात घेतले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *