पुणे -पुणे शहरातील सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार नीट न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर याचा मृत्यू झाला. त्यावरून घाईने उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलेला असतानाच शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना चांगलेच फटकारले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घाईने पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी योग्य ते उपचार मिळत नसल्याने नागरिकांचे मृत्यू होते आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर याचाही याचा हॉस्पिटलमध्ये योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला होता. त्यावरूनही पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. हे जम्बो हॉस्पिटल सुरु केल्यानंतर त्याचा पुणेकरांना लाभ होतो का, पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय उपाय योजना सुरु आहेत, यासंदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी पवारांनी चर्चा केली.
पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने काल ‘टीव्ही 9 मराठी’चे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या घटनेकडे पवारांनी बोट दाखवलं आणि पिंपरी मधील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये नेमकं कसे उपचार दिले जात आहेत, हा महत्वाचा प्रश्न असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. तुम्ही पाहताय पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो की सामान्य यात अनेक बिचाऱ्यांचे मृत्यू होत आहेत. कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करुनही अनेक बाबी समोर येत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.
डॉक्टर्स नाही, नर्स नाही, वेळेवर औषध नाही अशा तक्रारी येत आहेत”, अशी खंत ही पवारांनी व्यक्त केली. काही अति करतात, पण असं घडता कामा नये, अशी सूचनाही पवारांनी यावेळी दिली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला सातत्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेत असतात. तरीही हे संकट काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे खुद्द शरद पवारच आता मैदानात उतरले आहेत. मागील दोन दिवसांपासून पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
गुरुवारी-पिंपरी चिंचवड परिसरातील आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी लगेचच त्यांनी पुणे शहरातील कोरोन परिस्थितीचा आढावा घेतला.
उद्याही (शनिवार) पवार याबाबत आढावा घेणार आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य्म्नात्री राजेश टोपे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विकर्म कुमार, पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत.