पुणे(प्रतिनिधि)—लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बारामती मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार उद्या (गुरुवार दिनांक १८ एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता शांताई हॉटेल रास्ता पेठ येथे एकत्र येत बारामती लोकसभा मतदार संघाच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे आपल्या प्रमुख नेत्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचे नेते पहिल्यांचाच एवढ्या प्रमाणात एकत्र येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीची पहिली प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी शरद पवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण,संग्राम थोपटे, संजय जगताप, संजय राउत, संजय अहिर आणि सर्व पक्षीय आप, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजी माजी आमदार खासदार उपस्थित असणार आहेत.
सुनेत्रा पवारही उद्याच अर्ज दाखल करणार
दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचादेखील १८ एप्रिललाच म्हणजे उद्या (गुरुवार) अर्ज दाखल करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार नामनिर्देश पत्र विकत घेतलं आहे. आज सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारदेखील मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता आहे.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार एकत्र अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार २३ किंवा २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. याच आढळळराव पाटील,मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीचे मोठे नेतेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.