पुणे : अग्रगण्यय ना-नफा गृहनिर्माण संस्था हॅबिटेट फॉर ह्यूमनिटी इंडिया हिने एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील, बुरसेवाडी येथे १८ घरे आणि ४० घरगुती स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे. सुरक्षित आणि माफक गृहनिर्माणाची तातडीची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने हे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या घरे आणि स्वच्छतागृहांचे संबंधित कुटुंबांना हस्तांतरण करण्यात आले. यावेळी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या ब्रँड मार्केटिंग जनरल मॅनेजर नीता लिन्झ, खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, हॅबिटेट इंडियाचे कर्मचारी आणि घरमालक उपस्थित होते.
हा उपक्रम म्हणजे ‘घर बांधूया’ (लेट्स बिल्ड अ हाऊस) या नावाच्या एका सर्वांगीण गृहनिर्माण आणि स्वच्छता प्रकल्पाचा भाग आहे. यात हॅबिटेट इंडिया एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या सहकार्याने पुणे (महाराष्ट्र) आणि गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील वंचित कुटुंबांसाठी ३४ नवी घरे आणि ८० घरगुती स्वच्छतागृहे बांधून देणार आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना हॅबिटेट फॉर ह्यूमनिटीचे राष्ट्रीय संचालक (अंतरिम) जेम्स सॅम्युएल म्हणाले, “या प्रकल्पाचा सखोल परिणाम झाला आहे. त्यातून १८ कुटुंबांना दिवाणखाना, स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृहांची सोय असलेली स्वतःची सुरक्षित आणि माफक घरे मिळण्याची ताकद मिळाली आहे. तसेच ४० कुुटुंबांना स्वच्छतागृहे मिळाली आहे. हा उपक्रम म्हणजे घरे, समुदाय आणि आशेची बांधणी करण्याच्या हॅबिटेट फॉर ह्यूमनिटीच्या अतूट कटिबद्धतेचे प्रतीक आहे.”
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील हा मोठा टप्पा गाठल्याचा आनंद साजरा करताना, उत्तर प्रदेशातील लोकांपर्यंत आमचे कार्य पोचले आहे, हे सांगताना आम्हाला आनंद वाटतो. तिथे १६ नवी घरे आणि ४० स्वच्छतागृहे पूर्णतेच्या मार्गावर आहेत. एकावेळी एक घर या गतीने समुदायाचे परिवर्तन करण्यासाठी आमचे समर्पण त्यातून दिसून येते.”
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या ब्रँड मार्केटिंग जनरल मॅनेजर नीता लिन्झ म्हणाल्या, “हॅबिटेट फॉर ह्यूमनिटच्या या परिवर्तन घडविणाऱ्या उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला आनंंद वाटतो. फक्त घरेच नाही तर शाश्वत आणि समावेशक समुदायाची बांधणी करण्याचा एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाला अभिमान आहे. जीवनात सुधारणा घडविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या शक्तीवर आमचा नेहमीच विश्वास राहिला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्याचे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातील ही कामगिरी पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करतानाच येत्या हस्तांतराकडे आमचे लक्ष लागलेे आहे. तिथे आम्ही गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येेथे ४० स्वच्छतागृहे आणि १६ नवी घरे संबंधित कुटुंबांना सुपूर्त करणार आहोत. सर्वांसाठी जीवन सुुकर करण्याची आमची दृष्टी त्यातून अधोरेखित होईल.”