नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीबाबत रूग्णालयातर्फे माहिती देण्यात आली. मुखर्जी यांच्यावर आर्मी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या १० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही.
रूग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रणव मुखर्जी यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला आहे. यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. त्यांना अजूनही व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचं त्यांच्याकडे लक्ष आहे. यापूर्वी प्रणव मुखर्जी कोमामध्ये गेले असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या. ज्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने म्हणजेच अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करुन माहिती दिली की, माझे वडील प्रणव मुखर्जी सुखरुप आहेत. त्यांच्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.