पुणे- अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. समाज माध्यमांवर दोन्ही बाजूने मिम्स, टीका, टिप्पणी सुरू आहे. तर दोन्ही बाजूचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या भूमिकेवरून भावनिक साद घालत आहेत. शरद पवार(Sharad Pawar) यांचे नातू आमदार रोहित पवार(Rohit Pawar) हेही ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. त्यांनी असेच एक शरद पवारांना उद्देशून हे ट्वीट केले आहे. (Maharashtra Politics Crisis)
आज या दारात… उद्या त्या दारात…
पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल
मग लोकांना काय सांगणार?
तोंड कसं दाखवणार?
काल तर कडवा विरोध होता..
मग आज अचानक गळ्यात गळा कसा?
तो कोणता गळ आहे…
ज्या गळाला लागला मासा!
तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं?
रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं?
अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?
किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?
जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा..
आता कुणाकडून करायची जनतेने आशा?
भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा..
कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..
इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..
कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत…
स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत.
कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा?
निर्लज्जपणाचा झाला कळस…
तुम्हाला येत नाही याची किळस?
मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची
ही कोणती रित?
ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली..
ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली?
शिव-शाहू-फुले-आंबेडकर…
तुम्ही महाराष्ट्र घडवला…
तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं..
पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
हे होत असेल तर रोखायचं कुणी?
विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी?
त्यासाठी साहेब….
लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती
आता तुम्हीच उठा…
अन मैदानात उतरा…
शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ..
त्यात माझेही असतील दोन हात..