भावना आणि विचार यांची हार्मनी साधणे महत्त्वाचे-ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे 


पुणे : भावनेतून विचारांना प्रेरणा मिळाली व विचार योग्य कृतीतून प्रकट झाले तर भावना आणि विचार यांची हार्मनी साधली जाते, असे मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) व ज्येष्ठ अभिनेते (Senior actor) डॉ. मोहन आगाशे (Dr. Mohan Agashe) यांनी व्यक्त केले. डॉ. मीनल नरवणे (Dr . Minal Naravane) लिखित ‘वेध भावनांचा – भावनांची निर्मिती, अभिव्यक्ती, व्यवस्थापन’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड (ratnakar Gaikwad) यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.

हॉटेल श्रेयस येथील अंबर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, डिरेक्टोरेट ऑफ म्युनिसिपल अॅडमिनिस्ट्रेशनचे संचालक किरण कुलकर्णी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, झोन एकचे डिसीपी संदीपसिंग गिल, झारखंड अकॅडमिक कौन्सिलचे अध्यक्ष अनिलकुमार महतो तसेच इंटेलिजन्स जीएसटीचे संचालक कुणालकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  राजू शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल

डॉ.‌ आगाशे म्हणाले, “कुठलाही अनुभव भावनेपाशीच न थांबता, विचारापर्यंत पोचला पाहिजे. भावनेवर विवेकी विचाराचा अंकुश हवा तरच योग्य कृती घडते. शब्द श्राव्य होता, तोवर भावनांचा आविष्कार वेगळा होता, लेखनाची सुरुवात झाली आणि त्यात आमूलाग्र बदल झाला. भावना मनात निर्माण होतात, पण शरीरावरही परिणाम करतात. त्यामुळे मन आणि शरीर हे नाते ‘ट्यून’ करायला हवे. त्यातूनच विवेकी कृतीचे संगीत जन्माला येते. या पुस्तकात हाच आशय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”

रत्नाकर गायकवाड यांनी भावनांच्या अनुषंगाने विपश्यनेचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट केले. डॉ. मीनल यांनी भावनेसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयावर या पुस्तकात भाष्य केले आहे. भावना आणि मनाचा संबंध उलगडला आहे, असेही ते म्हणाले.

लेखिका डॉ. मीनल नरवणे म्हणाल्या, “आपण पदोपदी भावना अनुभवतो. भावना सदोदित सोबत असतात. आपल्या निर्णयावर परिणाम करतात. त्यामुळे भावनांचा उगम, सातत्य, तीव्रता यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा झाली आणि त्या अभ्यासातून या पुस्तकाची निर्मिती झाली. पुस्तकात ६ प्रकरणे आहेत. या विषयाचा अभ्यास सतत सुरू राहणार असल्याने विविध व्यवसायांशी संबंधित भावनिक अंगांविषयीचे ताजे लेखन वाचकांपर्यंत नेण्यासाठी ब्लॉगची निर्मिती देखिल केली आहे.”

अधिक वाचा  वेदना व्यवस्थापन या शाखेला सुपर स्पेशालिटी म्हणून मान्यता मिळावी - तज्ञ : इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन,आयएसएसपीकॉन २०२४ पुण्यात राष्ट्रीय परिषद संपन्न

प्रज्ञा दासरवार यांनी डॉ. मीनल नरवणे यांचा परिचय करून दिला. डॉ. मेधा देऊस्कर यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. अबोली नरवणे यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. नेहा कुलकर्णी यांनी आभार मानले. सुरवातीला अनघा पेंडसे, जयदीप वैद्य यांनी विविध भावना आविष्कृत करणारी मराठी आणि हिंदी गीते सादर केली. त्यांना केदार परांजपे यांनी हार्मोनिअमची तर विक्रम भट यांनी तबल्याची साथ केली. अभिजीत कुलकर्णी आणि कुणाल कुमार यांनी कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केले तर मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love