लोणावळा- लोणावळय़ासह सबंध मावळ तालुक्यात पावसाने थैमान घातले असून, लोणावळा शहरामध्ये बुधवारी 24 तासात 370 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मागील 3 दिवसांत लोणावळय़ात तब्बल 798 मिमी पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा व गावांचा संपर्क तुटला आहे.
लोणावळा ग्रामीण भागातील कार्ला, मळवली, देवले, पाटण, सदापूर या गावांना पुराचा विळखा बसला असून सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे जाण्या येण्याचे मार्ग बंद झाले आहेत. वडगाव बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी घुसले असून, पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वडगाव व ब्राह्मणवाडी या ठिकाणी मोठय़ प्रमाणात पाणी साचल्याने राष्ट्रीय महामार्गावरून अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, पूरस्थितीमुळे पर्यटकांना पर्यटनाकरिता मज्जाव करण्यात आला आहे.
पर्यटननगरी लोणावळय़ात पावसाळय़ामध्ये दमदार पाऊस होत असतो. जूनमध्येही चांगली स्थिती असली, तरी जुलै महिना खऱया अर्थाने पावसाने गाजवला आहे. मागच्या तीन दिवसात लोणावळा व मावळ परिसरात पावसाचे अक्षरश: धूमशान सुरू आहे. मुसळधार पावसामुळे लोहगड किल्ल्याकडे जाणाऱया एका रस्त्याला मोठय़ा प्रमाणात भेगा पडल्या आहेत, तर राजमाची किल्ल्याकडे जाणाऱया रस्त्यावर डोंगरावरून मोठय़ा प्रमाणात माती व दगड वाहून आल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. आई एकवीरा देवीच्या डोंगरावरून प्रचंड वेगात पाणी पायऱयांवरून वाहत असून, या भागाला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कार्ला ते वेहेरगाव या रस्त्यावर पाण्याचे लोट दिसत आहेत. लोणावळा शहरातील डेनकर कॉलनी, निशिगंधा सोसायटी, बद्री विशाल सोसायटीला पाण्याचा विळखा पडला असून शेजारीच असलेल्या डोंगरगाव, वेताळनगर येथील काही घरांमध्ये पाणी घुसल्याने दहा कुटुंबांचे स्थलांत जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले आहे. मावळ तालुक्मयातील वडिवळे या धरणामधून दहा हजार क्मयुसेक वेगाने पाणी कुंडलिका नदीमध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे पुढे जाऊन इंद्रायणी नदीला पूर आला असून, टाकवे गावचा पूल हा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण मावळ तालुक्मयामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अतिवृष्टी व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मावळ तालुक्मयामधील सर्व पर्यटनस्थळे ही 29 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मावळ प्रांत अधिकारी यांनी दिले असून, पर्यटकांना पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. द्रुतगती महामार्गही बाधित झाली असून, मार्गावर दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे पहायला मिळत होते.
पवना धरण क्षेत्रातही अतिवृष्टी
पवना धरण क्षेत्रामध्ये देखील बुधवारी 24 तासांमध्ये 374 मिलिमीटर पाऊस झाला असून धरणाचा पाणीसाठा गुरुवारी सायंकाळपर्यंत 75 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. पवना धरणाच्या पाणीसाठय़ातदेखील झपाटय़ाने वाढ होऊ लागल्याने पवना परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. लोणावळा शहरांमधील सर्व शाळांना गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस, तर उर्वरित मावळ तालुक्यातील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. ज्या भागामध्ये पाणी साचले आहे, अशा भागातील शाळा व्यवस्थापन व स्थानिक प्रशासन यांनी सुट्टीबाबत निर्णय घ्यावा, असे मावळ तहसीलदार यांनी कळविले आहे.