पुणे- दरवर्षी प्रमाणे यंदाही ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी यावर्षी देखील कायम राखले आहे. यंदा १९ सप्टेंबर ते २८सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सव काळात होणाऱ्या ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट, मल्लखांब स्पर्धा, बॉक्सिंग स्पर्धा , कुस्ती स्पर्धा आणि विंटेज स्कूटररैली यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड आणि पुणे फेस्टिव्हल क्रीडा समितीचे संयोजक प्रसन्न गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. (35th Pune Festival to host sports events)
गोल्फ स्पर्धा – पुणे गोल्फ कप टूर्नामेंट शुक्रवार दि. २२ सप्टेंबर व शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा. येरवडा गोल्फ क्लब येथे होत असून दुपारी १२ वा. बक्षीस वितरण समारंभ पार पडेल. यामध्ये हँडी कॅप प्रकारात गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ डिव्हिजन असे गट असून, यंदा १०० हून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे संयोजन पुणे गोल्फ क्लबचे जयदीप पटवर्धन आणि प्रदीप दळवी यांनी केले आहे.
बॉक्सिंग स्पर्धा – दरवर्षीप्रमाणे पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धा शनिवार दि. २३ सप्टेंबर व रविवार दि. २४ सप्टेंबर या दोन दिवशी जनरल वैद्य स्टेडीअम, भवानी पेठ, पुणे येथे संपूर्ण दिवसभर चालू राहतील. यात एकूण ६० स्पर्धक असून विविध वजन गटातील कप क्लास कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनिअर युथ आणि इलाईट प्रकारात संपन्न होतील. या स्पर्धा जिल्हास्तरीय असून पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या आहेत. माजी राज्यमंत्री रमेश बागवे व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी याचे आयोजन केले आहे.
मल्लखांब स्पर्धा – पुण्याच्या टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ येथे शनिवार दि. २३ सप्टेंबर व रविवार दि. २४ सप्टेंबर या दोन दिवशी पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या संयोजनाने विविध वयोगटातील मुले व मुली, स्पर्धकांसाठी पुरलेल्या मल्लखांबावर मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून विविध वयोगटातील पहिल्या ३ विजेत्यांना पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्र मंडळाचे अभिजित भोसले व सचिन परदेशी यांनी याचे आयोजन केले आहे.
कुस्ती स्पर्धा – कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत पुणे जिल्हा कुस्ती संघटनेच्या सहकार्याने विविध वयोगटातील पैलवानांसाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे व पंकज हरपुडे यांनी केले आहे.
विंटेज स्कूटररैली– यंदाच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजता पुण्यात एक नवीन उत्सवी कार्यक्रम ‘व्हिंटेज स्कूटर रैली’ आयोजित केली जाईल. व्हिक्टरी थिएटर ईस्ट स्ट्रीट येथून सकाळी ८.३० वाजता फ्लॅग ऑफ होईल आणि द फर्न हॉटेल, अमनोरा, हडपसर येथे समाप्त होईल. त्यात १९५६ ते १९८० या काळातील ५० – ६० वर्षांपूर्वीच्या २५ ते ३० क्लासिक स्कूटर असतील. त्यापैकी अनेक मूळ आकारात असतील आणि इतर काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेल्या असतील ज्या पूर्व-निर्धारित रॅलीच्या मार्गावर जातील. जयू दारूखानवाला यांनी याचे आयोजन केले आहे.
३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प आणि नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.