मुंबई—महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद अनेकवेळा चव्हाट्यावर आला आहे. परंतु, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असे, तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून कुठलाही वाद झाला की नंतर स्पष्ट केले जाते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्याचीच संधी साधून आम्हाला सरकार पाडायची गरज नाही, त्यांच्यातील वादानेच हे सरकार पडेल अशी वारंवार टीका करत असतात.
आता पुन्हा फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘हे सरकार म्हणजे लिव्ह आणि रिलेशन मध्ये राहणारे सरकार आहे’, ते कुटुंब नाही, त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल असं वाटत नाही’,असे वक्तव्य केले आहे तर या सरकारचे स्टेरिंग नक्की कोणाच्या हातात आहे हेच कळत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. त्यावरून पुन्हा एकदा राजकीय वादंगाला तोंड फुटले आहे.
फडणवीस यांच्या या वक्तव्याला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘भारतीय माणसाला आणि त्यातल्या त्यात मराठी माणसाला लिव्ह इन रिलेशनशिप काय असते हे माहितीही नाही, यांच्या मनात असे विचार येतातच कसे? कुठल्या संस्कृतीचे हे प्रतिनिधित्व करतात ? असा सवल करत कशाच्या आधारावर हे भविष्यवाणी करतात हेच समजत नाही असे म्हटले आहे.
थोरात यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. राज ठाकरे यांनीही “हे सरकार फार टिकेल, असे वाटत नाही’’, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना ‘सरकार फार काळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणी हे लोक कशाच्या आधारावर करतात हेच समजत नाही’, असा टोला थोरात यांनी लगावला आहे.
“राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार”, आणि हे सरकार टिकणार असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. भारतीय माणसाला त्यातल्या त्यात मराठी माणसाला लिव्ह इन रिलेशन काय असतं, हे माहितीही नाही. हा भारतीय संस्कृतीतला शब्द नाही. त्यांनी माहिती घ्यावी आणि याबाबतीत आत्मचिंतन करण्याचा सल्ला थोरात यांनी फडणवीस यांना दिला आहे.