लोकमान्य सुधारक!


स्मरण लोकमान्यांचे – भाग ६

फिमेल हायस्कूलमधील शिक्षणक्रम, संमतीवयाचा कायदा, दादाजी विरुद्ध रखमा हा खटला, सामाजिक परिषदेचा वाद, या सगळ्यात टिळकांनी जाहीर विरोध केला हे आपल्याला ठाऊक असेल, मात्र यापैकी प्रत्येक प्रकरणात टिळकांनी या सुधारणा लोकांना विश्वासात घेऊन कशा अमलात आणता येतील याचे मार्गही सांगून ठेवले आहेत, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आपल्या धर्माची सुधारणा आपण करू, त्यासाठी ब्रिटिशांनी कायदा करण्याची जरूर नाही, असे सांगतांना समाजाने स्वतःला नियम घालून घ्यावेत, आणि सुधारणा अंमलात आणावी यासाठी टिळक आग्रही असत.

स्त्रीशिक्षण, प्रौढ विवाह यांना टिळकांचा विरोध नव्हता, मात्र समाजाच्या साथीने जनमत तयार करून हे निर्णय घ्यावेत असे त्यांना वाटे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेल्या पुनर्विवाहाचे टिळकांनी केसरीतून जाहीर कौतुक केले आहे, हे अनेकांना ठाऊक नसेल. “आमच्या कार्याला टिळकांनी मोठा हातभार लावला, त्यांचा पाठिंबा होता म्हणून मी बरेच काही करू शकलो,” असेही कर्व्यांनी आदरपूर्वक नमूद केलेले आहे. अबलोन्नती लेखमालेच्या निमित्ताने त्यांनी सुधारणाविषयक पुस्तिका केसरीच्या अंकातून फुकट वाटल्या होत्या हेही नमूद करतो. सुधारणा कशी घडवून आणता येईल याबद्दल सुधारक मंडळींना केलेले मार्गदर्शन वाचनीय आणि आचरणीय आहे. 

टिळकांच्या सुधारणाविषयक मतांबद्दल बोलतांना आपल्या स्वतःच्या खासगी जीवनात टिळक कसे वागले? याचाही विचार करूया. स्वतःच्या मुलींना टिळकांनी व्यवस्थित शिकवले, त्यांच्या लग्नाची मर्यादा इतर सनातनी ब्राह्मणांना रुचणार नाही इतकी वाढवली, पहिल्या मुलीचा विवाह तर नाशिकच्या सुधारक घराण्यात लावून दिला. “दोन्ही बाजूंचे लोक सुधारक म्हणून हा विवाह जमला” अशी कबुली टिळकांच्या स्नेह्यांनी दिली आहे. म्हणून सीतारामपंत पटवर्धन यांची मुलगी मॅट्रिक पास झाल्याचे त्यांना मंडालेच्या तुरुंगात समजले तेव्हा टिळकांनी पत्रातून तिचे तोंडभरून कौतुक केले होते हे लक्षात घ्यायला हवे.

वेदोक्ताचे अधिकार शाहू महाराजांना द्यायला टिळकांचा विरोध नव्हताच, धर्मशास्त्राप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन वेदोक्ताचे विधी पुन्हा सुरू झाले तर वाद मिटणार होता, दुर्दैवाने तसे न झाल्याने वेदोक्त प्रकरण चिघळले. प्रौढ विवाह धर्माला मंजूर आहे हे टिळकांनी जाहीर लेखात पटवून दिलेले आहे. संकर विवाह, व्यवसाय स्वातंत्र्य, स्त्री जीवनाचे आधुनिकीकरण याबद्दल धर्मशास्त्राचे दाखले देऊन हे बदल घडून येणे धर्मालाही मान्य आहे असेच लिहिले आहे.

अधिक वाचा  गुढी उभारू आनंदाची,समृद्धीची आणि आरोग्याची..

“साक्षात देवालाही अस्पृश्यता मान्य नाही, तर आम्ही माणसांनी ती का पाळावी. जाती जातीत जेवण्यासाठी व स्पर्शास्पर्श मोडून टाकण्यासाठी मी अनूकुलआहे, हे मी अनेकवेळा बोलून दाखवले आहे. सर्व हिंदूंना प्रवेश मिळेल असे एखादे मंदिर तुम्ही बांधा, सर्व हिंदूंशी बोलण्यास मी नक्की येईन, याचे आश्वासन विठ्ठल रामजी यांना टिळकांनीच दिले होते. टिळक हे सुधारणेबद्दल प्रतिगामी आहेत असे म्हणणाऱ्या लोकांना सणसणीत उत्तर देण्यासाठी सुधारणामहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्वतः टिळकांच्या आठवणी लिहिल्या आहेत आणि टिळक प्रतिगामी किंवा सुधारणेला विरोध करणारे नाहीत, तर ते कसे अस्सल सुधारक आहेत हे पटवून देण्यासाठी आपण या आठवणी लिहित आहोत असे नमूदही केले आहे. टिळकांचे सुरुवातीच्या काळातले सख्खे मित्र आगरकर नेहमी म्हणत, “आमचे बळवंतराव आधी पक्के सुधारकच होते, नंतर ते पगडी फिरवून दुसऱ्या गोटात गेले.” गणेशोत्सवातील अस्पृश्यांचे मेळे असोत किंवा शिवजयंतीला ब्राह्मणांच्या बरोबरीने इतर जातींच्या पंगती उठणे असो, यातून टिळकांनी बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हातभारच लावलेला आहे.

स्वराज्याच्या आंदोलनात टिळक सर्व जातींधर्माकडून जातील तिथे सत्कार स्वीकारत होते. त्या जातीच्या लोकांनाही टिळक तर ब्राह्मण! त्यांना आपण कसे बोलवावे, टिळक आपला सत्कार स्वीकारतील का? असे वाटले नाही, आणि टिळकांनीसुद्धा असा भेदाभेद पाळला नाही. स्वराज्यासाठी मुसलमानांच्या दर्ग्यातही जायला टिळकांनी मागेपुढे पाहिले नाही. लखनौ करारानंतर तर मुसलमानसुद्धा टिळकांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत. अस्पृश्यांना उद्देशून टिळक लोकांना म्हणत, “हिंदू आणि मुसलमान यांची देखील युती झाली आहे, तर मग ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यात एकी होऊ शकणार नाही काय? राष्ट्राचे आत्यंतिक कल्याण होत असेल तर मी अस्पृश्यवर्गासोबत सर्व व्यवहार करण्यास तयार आहे.” पुण्यात सुरुवातीच्या काळात वेळ अशी होती की ख्रिश्चनाच्या हातून चहा प्यायल्याने प्रायशित्त घेणारे लोकमान्य, देशकार्याच्या गंगौघात अस्पृश्यच काय पण मुसलमानाच्या हातूनही अन्नपाणी घेऊ लागले. राष्ट्रकार्यात त्यांनी भेदाभेदाला जागाच ठेवली नाही. परिणामी होमरूल लीगच्या पहिल्या वार्षिक अधिवेशनात सहभागी सदस्यांची संख्या होती तब्बल १४,२१८. ज्यापैकी शेकडा ४२० ब्राह्मण, ४३० ब्राह्मणेतर, ३०९ मुसलमान, ११ पारशी आणि ६९ स्त्रिया सहभागी होत्या. मुंबईच्या मारवाड्यांनी टिळकांना १५००० रुपयांची थैली अर्पण केली. जैन, लिंगायत हेही समाज टिळकांच्या पाठीशी उभे राहिले. वेदोक्त प्रकरणानंतरही हजारोंच्या संख्येने राष्ट्रनिष्ठ मराठे टिळकांच्याच बाजूने उभे होते. तब्बल सोळा हजार कामगारांनी एकेक आणा वर्गणी जमवून त्या काळात १००० रुपयांची थैली टिळकांच्या स्वराज्य फंडाला अर्पण केले.

अधिक वाचा  तेजोनिधी स्वामी विवेकानंद

भेदाभेदाच्या महारोगावर त्यांना उतारा दिसत होता तो राष्ट्रीय शिक्षणाचा. “राष्ट्रीय शिक्षण ब्राह्मणांकरिताच नको आहे, अंत्यजाला, चांभाराला, सोनाराला सर्वांनाच ते शिक्षण मिळाले पाहिजे.” इतकेच बोलून न थांबता टिळक पुढे म्हणतात की, “जातीभेद मोडण्याची आवश्यकता किती आहे हे आमच्या विद्यार्थ्यांस समजले पाहिजे. जातीजातींचे तंटे न होऊ देण्याची जबाबदारी घेणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे..” टिळक आणि त्यांच्या सहकार्यांची पिढी एकमेकांशी भांडण्यात गेली. पण आता येणाऱ्या पुढच्या पिढीवर सुरुवातीपासूनच जातीभेद न मानण्याचे संस्कार झाले तर समाजसुधारणा आणखी सोप्या होतील हेच टिळकांचे सांगणे आहे.

कष्टकऱ्यांचे मनोबल वाढवतांना टिळक म्हणतात, तुम्ही खालच्या जातीचे आहात म्हणून कमीपणा अजिबात मानू नका, तुम्हा मजुरांमध्ये साधुसंत निर्माण झाले, आणि त्यांच्या चरणी आम्ही ब्राह्मण लीन झालो.” स्पष्टच दिसते की, धर्मनिर्णय, किंवा धर्मप्रवचने कुणा एका जातीची मक्तेदारी आहे हे टिळकांना मान्यच नव्हते. त्याला राष्ट्रवादाची जोड देऊन टिळक विचार आपल्याला सांगतो की जात, धर्म ,वंश हे देशाच्या शासन व्यवस्थेवर कधीही प्रभावी ठरू नयेत. राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकांमधील गुणांचा विकास झाला की कुठल्याही क्षेत्रात अत्युच्च पदावर जाण्याचा मार्ग मोकळा आहे, मग तुमची जात, धर्म कुठला का असेना! प्रत्येक व्यक्तीला आपल्या आत दडलेल्या ‘स्व’ची जाणीव करून दिली, शिक्षण दिले की जातींचा भेद आपोआप मागे पडेल आणि मी अमुक, जातीचा हे मत पुढे येण्याच्या ऐवजी जात, मत यापेक्षा भारतीय नागरिक म्हणून भारतीय समाज घडेल, माझ्या धर्मविषयक मतापेक्षा राष्ट्राच्या कल्याणासाठी त्या राष्ट्राचा नागरिक म्हणून मी पुढे येईन, मग माझी, जात धर्म कुठलाही असो. स्वराज्यातील समाजरचनेचे भाकीत करतांना लोकमान्य म्हणाले होते, “भावी स्वराज्यात ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांना सारखेच हक्क व त्यांचा दर्जा सारखाच राहिल, यात शंका नको. ब्राह्मणी स्वराज्य होऊन त्यात ब्राह्मणांचा वरचष्मा राहणार अशी चुकीची कल्पना डोक्यात भरवून देशातील शहाण्यासुरत्या पुढाऱ्यांनी ठरवलेल्या योजनेस विरोध करणे योग्य नाही, ही दिशाभूल आहे.”- अशी दिशाभूल आज तरी थांबली आहे का?

अधिक वाचा  मराठवाडा मुक्ती संग्राम आणि रा. स्व. संघ

धार्मिक सुधारणा असो किंवा जातीपातींची सुधारणा, स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद हे सर्व मोडून काढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करायला हवी हा खरा टिळक विचार आहे. म्हणूनच टिळक म्हणत, सुधारणा घडवायची असेल तर आमची मनेच फिरली पाहिजेत! प्रत्येकाला मनापासून सुधारणेचे महत्व जाणवू लागेल, तेव्हा खरी सुधारणा होईल या टिळकवाक्याची तुम्हाआम्हाला थोरवी काळाने पटवून दिली आहे, नाही का?

– पार्थ बावस्कर.

संपर्क — ९१४६०१४९८९, ८२७५२०४५००

ई मेल – parthbawaskar९३@gmail.com

लेखक व्याख्याते, इतिहास संशोधक आहेत.

*(विश्व संवाद केंद्र (पुणे) द्वारा प्रकाशित)*

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love