पुणे—स्टील व्यावसायिकांना बनावट कंपनीचे कागदपत्र दाखवून लाखो रुपयांचे स्टील खरेदी करायचे आणि व्यावसायिकाला पैसे न देता त्याची फसवणूक करायची. असा फंडा वापरून गुन्हे करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला भोसरी पोलिसांनी पकडले आहे. टोळीचा म्होरक्या आणि एक साथीदार अद्याप फरार आहे. या आरोपींवर रायपुर, छत्तीसगड येथे एक, इंदौर, मध्यप्रदेश येथे एक, मुंबईमध्ये दोन, तेलंगणा राज्यात एक असे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून ३८ लाख १५ हजार २११ रुपये किमतीची स्टील जप्त करण्यात आले आहे.
दिपक किशोरीलाल गुजराल (वय ३२, रा. आदिनाथ नगर, आर्यन हाईटस भोसरी), विजयकुमार हरिराम विश्वकर्मा (वय ४५, रा. फ्लॅट नं. ७०७, बंन्सल सिटी, दिघी रोड, भोसरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. टोळीचा म्होरक्या हरिष राजपुत आणि त्याचा साथीदार सागर पारेख अद्याप फरार आहेत.
परशुराम साहेबराव भोसुरे (वय 50, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःची ओळख लपवून खोट्या कंपनीचे नाव सांगून तसेच खोटी कागदपत्रे दाखवून भोसुरे यांच्याकडून ३८ लाख १५ हजार २११ रुपये किमतीचे ६४ टन ८८० किलो वाजताचे स्टील एच आर शीट विकत घेतले. स्टील घेतल्यानंतर त्या मालाचे पैसे न देता भोसुरे यांची आरोपींनी आर्थिक फसवणूक केली असल्याचे भोसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या गुन्हयाचा तपास करत असताना पोलिसांना आरोपी दीपक आणि विजयकुमार या दोघांबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांच्या टोळीचा म्होरक्या हरिष आणि एक साथीदार सागर यांच्यासोबत मिळून केल्याचे सांगितले.
हरिष राजपुत व सागर पारेख हे इंडीया मार्ट या वेबसाईट वरून स्टील व्यवसायीकांशी संपर्क साधत. विजय विश्वकर्मा याचे नावे असलेल्या विश्वकर्मा ब्रदर्स या फर्मचे नाव व कागदपत्रे वापरून व पुढील तारखेचा चेक देऊन आरोपी व्यावसायिकांकडून स्टील खरेदी करत असत. त्यानंतर एखादी बंद असलेली स्टील कंपनी त्यांच्या मालकीची आहे असे सांगून त्या कंपनीच्या समोर खाली करून घेत. पुढे ते त्या ठिकाणावरून स्टील दुसरीकडे विक्रीसाठी घेऊन जात. ज्या व्यवसायीकाकडून स्टील खरेदी केले आहे. त्या व्यावसायिकाला पुढील तारखेचा चेक देऊन पैसे न देता त्याची फसवणूक करत.