पुणे(प्रतिनिधि)– ब्ल्यू व्हेल गेमच्या व्यसनात अडकलेल्या एका १५ वर्षीय मुलाने रात्री १ वाजता इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारुन स्वतःचं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात ही घटना घडली आहे. आर्य उमेश श्रीराव असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे.
आर्य गेल्या सहा महिन्यांपासून ब्ल्यू व्हेल गेमच्या विळख्यात अडकला होता. तो दिवसदिवसभरात आपल्या खोलीत बसून राहायचा. याशिवाय या काळात मृत्यूसंदर्भातील गाणी त्याला आवडू लागली होती. तो मोठ्या आवाजात मृत्यूसंदर्भातील इंग्रजीतील गाणी ऐकत होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याने इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी स्वत:च्या मृत्यूचा प्लान आखला होता. त्याने पेन्सिलिने याचे स्केच तयार केले होते.
आर्यचे वडील नायजेरियात कामाला आहेत. मुलगा सहा महिन्यांपासून ब्लू व्हेल खेळत असावा असा अंदाज आहे. या काळात आर्य फार आक्रमक झाला होता. आई आणि भावाला मारहाण करीत होता. स्वत:च्या हातावर वर ब्लेड मारून घेत होता. सकाळी ८ वाजता खोलीत गेला की, सायंकाळपर्यंत बाहेर येत नव्हता. आर्यने एक सुसाईट नोट लिहिली आहे. त्यावर त्याने ‘लॅाग आऊट नोट, हाऊ टू राईट सुसाईट नोट’ असं लिहिलं आहे. याच्याशेजारी दोन इमोजी आहेत.
आणि… आईच्या पायाखालची जमीनचं सरकली
आर्य १४ व्या मजल्यावर राहत होता. त्याच्या घराच्या बाल्कनीला कबुतरांसाठीची नायलॅानची जाळी लावलेली आहे. ती जाळी कशी कापायची आणि खाली उडी कशी मारायची याचे स्केच मुलाने उडी मारण्यापूर्वी तयार केले होते. काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेम खूप चर्चेत आला होता. या गेमचा शेवटचा टप्पा म्हणजे स्वतःला संपवणं. अशातच हा गेम खेळत असताना प्रत्येक टप्पा पार करीत १५ वर्षांच्या आर्यने शेवटच्या टप्प्यात स्वतःला संपवलं अन् बाल्कनीतून उडी मारली.
गेल्या सहा महिन्यांपासून गेमच्या आहारी गेलेला आर्य स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. घरात आजवर वडिलधाऱ्यांना घाबरणारा मुलगा थेट किचनमधील चाकूची मागणी करायला लागला होता. हा बदल पाहून आई-वडीलही चिंतेत होते. अतिवृष्टीमुळं २५ जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातचं घालवला. मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतचं जाऊन बसला. आई-वडील दुसऱ्या मुलाला ताप आल्यानं त्या चिंतेत होते. रात्रीचा एक वाजला तरी देखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळं आई जागीचं होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुलगा जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा घरात नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, बघते तर काय? तो तीचाचं मुलगा होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या लेकाला पाहून, आईची पायाखालची जमीनचं सरकली. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.