राजीव सातव यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या त्यांच्या जवळच्या 20 नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करा


पुणे- कॉँग्रेसचे दिवंगत नेते खासदार राजीव सातव यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या त्यांच्या जवळच्या 20 नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे. पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे.

शासनाने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत कडक निर्बंध घालून अंत्ययात्रेला 20 जणांना परवानगी दिली आहे. यापेक्षा जास्त लोक आढळल्यास जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जातो. शासनाने हा नियम केवळ गरीब जनतेसाठी बनवला आहे का? सातव यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्यांवर प्रशासन गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविल का? असा प्रश्न नाईक यांनी निवेदनात उपस्थित केला आहे. तसेच खासदार सातव यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींची कोरोना चाचणी करावी. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी प्रदीप नाईक यांनी केली आहे.

अधिक वाचा  संवेदनशील विषयावर बोलून वाद निर्माण करण्याचे काही जणांचे प्रयत्न : दिलीप वळसे पाटलांची राज ठाकरेंवर टीका

नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी मंत्री, खासदार, आमदार तसेच राज्याच्या बाहेरील काँग्रेसचे पदाधिकारी आणि नागरिक तसेच कळमनुरी हिंगोली येथील नागरिक व सातव यांचे चाहते एकत्र जमले होते.त्यात मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजित कदम, विजय वडेट्टीवार, खासदार हेमंत पाटील, सत्यजित तांबे, गुजरात युवक काँग्रेसचे मोनसिंग डोडया, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी के एच पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी उपस्थित होते. ही यादी हजारांच्या घरात जाईल, असेही नाईक यांच्या निवेदनात म्हटले आहे.

.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love