अमित शहा -फडणवीस यांच्या बैठकीत नक्की काय घडल? काय म्हणाले फडणवीस?

राजकारण
Spread the love

दिल्ली(ऑनलाईन टीम) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १७ जुलै) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राजस्थानातील घडत असलेल्या  राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण यादृष्टीने ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. परंतु, फडणवीस यांनी या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. “आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा,” असा टोला फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना राज्यातील महाविकास आघाडीला लगावला.

 राज्यातील कोरोना संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती दिली. देशाचे गृहमंत्री कोरोना संदर्भात लक्ष देत आहे. केंद्रात आमचे सरकार आहे, त्यामुळे आम्ही दिल्लीत आलो. ही कुठलीही राजकीय भेट नाही. आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही. स्वतःला मारून रडणारे हे सरकार आहे,’ अशी प्रतिक्रिया अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

महा जॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसनं शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून फडणवीस यांनी चिमटा काढला असून, “आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.

शरद पवारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “शरद पवार त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय आणि अशी काही स्पर्धा नाहीये की त्यांनी काय केलं म्हणून आम्ही करायचं. तसेच आम्ही काय केलं म्हणून त्यांनी काय करायचं. आम्हाला असं वाटतं की, सध्या साखर उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या पक्षातील साखर उद्योगात असलेल्या नेत्यांनीही याचं गांभिर्य आमच्या लक्षात आणून दिलं आहे. केंद्रात आमचं सरकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे आम्ही मागणी घेऊन जाणं, हे अपेक्षितच आहे म्हणून आम्ही आलो आहोत,” असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असे फडणवीस सांगत असले तरी या भेटीत राज्यातील कोरोनाची परिस्थिती, साखर उद्योगासह राज्यातील राजकारणाबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात जवळपास २५ मिनिटे वेगळी चर्चा झाली असून यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवरही खलबतं करण्यात आल्याची माहिती आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *