दहावीचा राज्याचा निकाल 95.30 टक्के;पंधरा वर्षातील सर्वाधिक निकाल

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे(प्रतिनिधी)—महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. दरम्यान, यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे.

दरम्यान, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी आज हा निकाल जाहीर केला.

 पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागात मार्च महिन्यात परक्षा घेण्यात आली होती. कोरोनाच्या संकटामुळे भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले असे,  शकुंतला काळे यांनी सांगितले.

यंदाही मुलींचीच बाजी

 राज्यात 96.91 टक्के विद्यार्थीनी तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसते. विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 3.1 टक्क्यांनी जास्त आहे. तर विभागवारी टक्केवारीत कोकण विभागाचा सर्वाधिक 98.77 टक्के, तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा 92 टक्के लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के लागला.

तर मुंबई विभागातून 96.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल.  

विभागनिहाय टक्केवारी

कोकण – 98.77 टक्के

पुणे – 97.34 टक्के

कोल्हापूर – 97.64 टक्के

मुंबई – 96.72 टक्के

अमरावती – 95.14 टक्के

नागपूर – 93.84 टक्के

नाशिक – 93.73 टक्के

लातूर – 93.09 टक्के

औरंगाबाद – 92 टक्के

या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार

 www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org  

www.maharashtraeducation.com

निकाल कसा पाहाल ?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

एसएमएसवर निकाल

बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766 वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल .

यंदा राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे.संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी ४ हजार ९७९ परीक्षा केंद्रे होती तर  एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोदणी केली होती. राज्यात दि. ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा पार पडली. याच कालावधीत कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यामुळे भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता.

पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुले व ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत.तर  एकूण ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

उद्यापासून गुण पडताळणी करता येणार

ऑनलाईन निकालानंतर लगेचच उद्यापासून दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज  करता येईल.गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत,छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल.

 उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यापुढील पाच दिवसांत अर्ज करावा. दहावीत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2020 आणि मार्च 2021 अशा दोन संधी उपलब्ध राहतील, असे शकुंतला काळे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *