टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आत्मनिर्भर भारत

लेख
Spread the love

स्मरण लोकमान्यांचे – भाग ४

लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात जी चतुःसूत्री दिली त्यामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार ही दोन सूत्रे होती. स्वदेशी मालाचा पुरस्कार आणि विदेशी मालाचा बहिष्कार यातून भारतीय जनतेच्या जीवनात स्वातंत्र्याचा संकल्प कृतीशील सहभागाने साकार करण्याचा त्यांचा विचार होता आणि विदेशी मालाच्या बहिष्कारातून इंग्रजांच्या अर्थकारणावर प्रहार करण्याची कल्पना होती.

 आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अशी संकल्पना मांडली आहे. कोरोनाशी लढताना आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेत २०  लाख कोटी रूपयांचे पॅकेजही जाहीर केले आहे. त्यात मजूर, शेतकरी, कष्टकरी यांच्याकरिता विविध योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत. लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षात त्यांच्या विचारांचे कालसुसंगत संदर्भ शोधताना स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारत हे नव्या भारताच्या निर्माणाचे धागे महत्वाचे ठरतात.

 स्वदेशीचा विचार हा स्वातंत्र्याचा कृतीशील हुंकार होता. मात्र  स्वराज्य मिळाल्यानंतर ७२  वर्षानंतरही स्वदेशी चळवळ अजून गतीमान करण्याची गरज निर्माण झाली आहे. अगदी जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे गोडवे गातानाही स्वदेशी ही संकल्पना अजून आवश्यक ठरते आहे. स्वराज्याच्या काळात देशाची उभारणी करताना आत्मनिर्भर भारत हा विचार लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी कल्पनेचाच कालसुसंगत अविष्कार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

 शोषण ही अशी गोष्ट आहे की ज्यांचे शोषण होते त्यांना त्याची जाणीवच लवकर होत नसते. इंग्रजांनी भारतातील कच्चामाल स्वस्तात नेवून पक्का माल पुन्हा भारतातच महाग किंमतीत विकून एकीकडे नफाखोरी आणि दुसरीकडे भारतीय उद्योगांना संपविण्याचे जे दुहेरी शोषण चालविले होते त्याकडे ज्या नेमक्या द्रष्ट्या महापुरूषांनी जनतेचे लक्ष वेधले त्यामध्ये लोकमान्य टिळक होते. त्यामुळे स्वदेशीचा पुरस्कार आणि विदेशी मालाचा बहिष्कार असा दुहेरी कार्यक्रम त्यांनी दिला होता. मँचेस्टरची धोतरे बंद करण्यापुरती आजची चळवळ नाही, तर आम्हास गोऱ्यांचे सर्व हक्क मिळावेत व त्यांनी ते न दिल्यास त्यांच्याकडून आम्ही अडवून घ्यावे, म्हणून आजची स्वदेशी चळवळ निघाली आहे. असे बेळगावच्या गणेशोत्सवातील सभेत स्वदेशीतून स्वराज्य या विषयावर बोलताना सांगितले होते.

अर्थिक कार्यक्रमातून इंग्रजांच्या व्यापारी धोरणावर हल्ला आणि त्याच आधारे जनतेच्या मनातील स्वातंत्र्याची उर्मी जागविण्याचा त्यांचा हेतू होता. स्वराज्यानंतर आता जागतिकीकरणाचा काळ आला आहे. या काळात स्वदेशी ही संकल्पना संकुचित व अशक्य कोटीतील वाटण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भरता हा या विषयाला पर्याय आहे. डंकेल प्रस्ताव भारताने स्विकारल्यानंतर भारतीय बाजारपेठ जागतिकदृष्ट्या खुली झाली आहे. त्याचबरोबर जगातील बाजारपेठाही भारतीय उत्पादकांना खुल्या झाल्या आहेत. मात्र भारतीय उत्पादकांची त्या दृष्टीने कसलीही तयारी नसताना हे घडल्यामुळे परदेशातील उत्पादक सव्वाशे कोटींची बाजारपेठ म्हणून भारताकडे लुटण्याचे क्षेत्र म्हणून आजही पहात आहेत. चीनने सीमारेषेजवळ केलेली आगळिक आणि त्यामुळे जनतेत जागृत झालेली देशभक्ती याचा नेमका उपयोग करून भारतीय बाजारपेठेत मोठा वाटा असलेल्या चीनी वस्तूंवर बहिष्काराची चळवळ चर्चेत आली आहे.

 डंकेल प्रस्ताव आणि उदारीकरणाची माहिती नसताना या विचारास समाजमाध्यमात “चीनी  वस्तूंवर आम्ही बहिष्कार घालण्यापेक्षा सरकारच बंदी का घालत नाही.’ असे मत काही

मंडळी व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र डंकेल प्रस्ताव स्विकारलेला असल्याने अशा प्रकारे बंदीचा विचार करता येत नाही मात्र बाजारपेठेत काय विकत घ्यायचे या निर्णयाचे  स्वातंत्र्य ग्राहकांच्या हाती आहे. त्यामुळे ग्राहक ही नव्या युगातील अर्थिक जगातील गुरूकिल्ली आहे. ग्राहक जागरणातून आत्मनिर्भरतेकडे जाण्याचा प्रवास सहज शक्य आहे. भारतीय ग्राहक भारतीय उत्पादकांच्या वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात विकत घेईल तसेतसे भारतीय उत्पादकांची ताकद परदेशातील बाजारपेठा पादाक्रांत करण्याइतकी वाढू शकेल. पहिली पायरी म्हणून परकीय मालावर बहिष्काराचा विचार करावा लागेल. कारण आमच्या बाजारपेठेच्या बळावर चीनसारख्या देशांचे अर्थकारण गब्बर होणार आणि त्याचाच वापर करत स्वतःची संरक्षणशक्ती वाढवून ते त्याचा वापर आमच्याच विरोधात करणार असे आत्मघातकी दुष्टचक्र आपल्याविरोधात घडता कामा नये, याची काळजी करणे नक्कीच भारतीय ग्राहकांच्या हाती आहे.

त्यादिशेनेत्यांचे जागरण करावे लागेल. कोरोनाच्या काळात कष्टकरी, शेतकरी, मजूर यांचे जे हाल होत असलेले दिसले त्यांच्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजना जाहीर केली. यामध्ये लघुउद्योजक, छोटे व्यापारी यांच्यासाठी करप्रणाली, अर्थसहाय्य आदीबाबत सवलतींची व्यवस्था करणारी कलमे आहेत. त्याशिवाय प्रवासी मजूरांची सुविधा, गरीबांसाठी वन नेशन वन रेशनकार्ड, किसान क्रेडिट कार्ड, नाबार्डमार्फत शेतकऱ्यांना मदत, रस्त्यावरील फेरीवाल्या विक्रेत्यांना अर्थसहाय्य, मजूरांसाठी स्वस्तात घरे अशा अनेक योजना आहेत. ही उपाययोजना तात्पुरती असली तरी कायमस्वरूपी आत्मनिर्भरतेकडे जाताना हाच विचार करावा लागेल. हा धागाही लोकमान्यांच्या विचारांशी जुळणारा आहे.

लोकमान्यांनी देशातील विदेशी वस्तूंचा वापर टाळण्याबरोबरच स्वदेशी उत्पादकांना ठामपणे उभे करण्याचाही विचार केला. त्यासाठी पैसाफंडाची कल्पना आणून त्यामधून काच कारखाना, डालडा फॅक्टरी, कापड गिरण्या उभारण्याची कल्पना आणली. टिळकांनी शेतकरी आणि कष्टकरी यांचा विचार अतिशय बारकाईने केला होता. टिळक म्हणत देश म्हणजे शेतकरी, देश म्हणजे काबाडकष्ट करणारी जनता. शेतकरी हा देशाचा कणा आहे, राष्ट्राचा आत्मा आहे असे सांगणारे लोकमान्य पहिले पुढारी. या काबाडकष्ट करणाऱ्यांची आर्थिक स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देशाची परिस्थिती सुधारली असे म्हणता येणार नाही.

आताची आत्मनिर्भर भारत योजना टिळकांच्या या विचारांचेच कोरोनाच्या काळातील एक प्रासंगिक रूप आहे. हेच भविष्यातील भारताच्या आत्मनिर्भरतेकडे जाणारे सूत्र ठरू शकते. जागतिकीकरण बरेच पुढे गेले असताना स्वदेशी चळवळ चालविणे आणि त्यात स्वदेशी आणि विदेशी वस्तूंच्या याद्या देवून आग्रह धरणे अवघड आहे. या याद्याही बदलत आहेत. स्वदेशी हा वस्तूंचा व्यवहार असला तरी ती भावनिक संकल्पना जास्त आहे. आत्मनिर्भरता हा स्वदेशीचा कालसुसंगत अवतारच आहे. बाजारातील खरेदी असो की उत्पादनातील धोरण असो. कष्टकरी आणि शेतकरी यांच्याबाबतीतले निर्णय असोत की आयात निर्यात धोरण असो प्रत्येकवेळी ग्राहक, प्रशासन, सरकार यांनी देशाच्या आत्मनिर्भरतेचा केंद्रबिंदू लक्षात घेवून त्याभोवतीच आपली कृती कशी राहील याचा विचार करावा लागेल.

सव्वाशे कोटींची बाजारपेठ ही भारताची मोठी ताकद आहे. या बाजारपेठेतील व्यवहारावर भारतीयांचेच विक्रेता आणि ग्राहक या दोन्ही नात्याने नियंत्रण असणे हे आत्मनिर्भरतेकडे जाणारे पहिले पाऊल असेल. सव्वाशे कोटी हात जेव्हा निर्मितीचे संकल्प घेवून जगात आपली निर्मिती पाठविण्याचा विचार करू लागतील व तितके सक्षम होतील तो दिवस देशाच्या भवितव्याला कलाटणी देणारा असेल. स्वदेशी हा या सर्व विचार आणि व्यवहाराचा मूलमंत्र असल्याने हा सर्व आता आणि भविष्यात केवळ वस्तूंच्या खरेदी, विक्री आणि उपभोगापुरता विचार राहता कामा नये तर भारतीयत्वाचा या सर्व व्यवहाराला स्पर्श होवून भारतीय चरित्रनिर्माणाचा सुगंध घेवून हा विचार जगाच्या कानाकोपऱ्यात जायला हवा !

दिलीप धारूरकर

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि राज्य माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.)

[email protected] <mailto:[email protected]>

(विश्व संवाद केंद्र,पुणे द्वारा प्रकाशित)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *