पुणे -स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवाजी महाराजांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचेधडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील ही मालिका लवकरच महत्त्वाचा टप्पा गाठणार असून जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार आहेत. नीना कुळकर्णींसारखी दिग्गज अभिनेत्री जिजाऊंची भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांची भूमिका डॉ. अमोल कोल्हे साकारणार आहेत. कोल्हे यांना शिवाजी महाराजांच्या रूपात पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. एकीकडे अफजल खान वध, सिद्दी जोहरचा पन्हाळगडाचा वेढा, महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली हे रोमांचक ऐतिहासिक प्रसंग ह्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा जिवंत होतील. तर दुसरीकडे महाराज पन्हाळगडावर अडकलेले असताना जिजाऊंनी स्वराज्याची धुरा कशी संभाळली, जिजाऊंचं स्वतःचं हेरखातं किती कार्यक्षम होतं अशा आजवर न पाहिलेली, ऐकलेली इतिहासातील अनेक रोमहर्षक पानं प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.