आजपासून (दि. १८ सप्टेंबर) अधिक मासाला प्रारंभ झाला आहे. तो १६ ऑक्टोबरला समाप्त होईल. हिंदू धर्मामध्ये अधिकमासाला वेगळे महत्व आहे. अधिकमास म्हणजे काय? अधिक मासात काय करावे? काय करू नये? याबाबत हिंदूधर्म शास्त्रानुसार काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याबाबत आपण जाणून घेऊ या…
अधिकमासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणूनही संबोधले जाते. सौर वर्षाचा मास ३६५ दिवस असतो तर चंद्र मास ३५४ दिवसांचा असतो. या दोन्ही मासामध्ये सुमारे ११ दिवसांचा फरक आहे. ही ११ दिवसांची दरी दूर करण्यासाठी ३२ महिन्यांमध्ये आणखी काही महिन्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जे पूर्णपणे विज्ञानाशी संबंधित आहे.
हिंदू धर्म आणि पंचांगात एक नाव पुरुषोत्तम मासाचे घेतले गेले आहे. भगवान विष्णूंना अधिकमासाचे अधिपती स्वामी म्हणून मानले जाते. पुरुषोत्तम हे भगवान विष्णू यांचेच एक नाव आहे. म्हणूनच अधिकमासाला पुरुषोत्तम मास म्हणूनही संबोधले जाते. या महिन्यात भगवान विष्णूची उपासना करणार्यास मोठ्या प्रमाणात फलप्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले आहे.
त्याच बरोबर, शास्त्रानुसार ज्या महिन्यात संक्रांती नसते त्या महिन्याला अधिक महिना म्हणतात. या महिन्यात लग्न, लग्न जुळवणे, घर बांधणी, गृह प्रवेश, मुंडन, संन्यास किंवा शिष्य दीक्षा घेणे,नवीन वधूचा प्रवेश, देवी-देवतांची प्राण-प्रतिष्ठा, यज्ञ, मोठ्या पूजेचा शुभारंभ, विहीर, बोरवेल खोदणे अशी पवित्र कामे केली जात नाहीत. तथापि, या महिन्यात काही कामे अशी आहेत की, ती कामे जो करतो त्याला या कामांचा करण्याचा सर्वात जास्त फायदा होतो. ही कामे कुठली आहेत ते पाहूया….
अधिकमासात ऐका सत्यनारायणाची कथा
अधिकमासामध्ये जो कोणी सत्यनारायणाची कथा ऐकतो त्याचा त्याला अपार फायदा होतो. या महिन्यात भगवान विष्णूची आराधना करावी. कारण अधिकमासा मध्ये पद्मिनी एकादशी येते, जी विष्णूला खूप प्रिय आहे.
विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करा
अधिकमासात भगवान विष्णूची स्तुती करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्रांचे पठण होय. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राचे तज्ञांचा असा विश्वास आहे की विष्णु सहस्रनाम स्तोत्रांच्या पठणाने कुंडलीतील गुरु ग्रह बळकट होतो.
भगवान शालिग्रामाचे दर्शन घ्या
पद्म पुराणानुसार अधिकमासात जो भगवान शालिग्रामाचे दर्शन घेतो, त्याच्यासमोर डोके टेकवतो, अभिषेक करून पूजा करतो, त्याला पुण्य आणि कोटी यज्ञांसमान किंवा कोटी वृक्षारोपणाचे फळ प्राप्त होते. भगवान शालीग्रामाची विधिवत पूजा करताना भगवान शालीग्रामा देवतेला चंदन लावावे तसेच तुळशीची पाने, सुवासिक फुले, नैवेद्य, फळे इत्यादी अर्पण करावे आणि ‘ओम नमो भगवते वासुदेव’ असे नामस्मरण करून कापूर आरती करावी. अभिषेकाचे पाणी स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांनी प्राशन करावे. याबरोबरच अधिकमासात श्रीमद्भागवत कथा, गीतेचे पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण विशेष फलप्राप्ती देते. भगवान शालिग्रामांचे स्मरण, कीर्तन, ध्यान, पूजा, अनेक पापे दूर होतात असे पुराणात म्हटले आहे.
भगवान विष्णूंना केशराचा टीळा लावा
अधिकमासात सकाळी लवकर उठून भगवान विष्णुंची पूजा करावी. जगाचे पालनहार असलेल्या भगवान विष्णूंची आराधना करताना केशराचा टिळा लावणे हे शुभ मानले जाते. भगवान विष्णूंना खिरीचा नैवद्य दाखवा. सूर्याला जल अर्पण करा.
अधिकमासात दान करा
अधिकमासात मुलीची पूजा केली पाहिजे. तसेच या महिन्यात जेवढे जमेल तेवढे जास्तीत जास्त पुण्य-दान करा. अधिकमासात केलेले दान, पूजा-प्रार्थना आणि उपवास केल्याने मोठ्या प्रमाणात फलप्राप्ती होते.
यंदा जुळून आला आहे खास योग
यंदा एक खास योग जुळून आला आहे. जो तब्बल 160 वर्षापूर्वी आला होता. असा योग पुन्हा 2039 मध्ये जुळून येईल. यावर्षी लीप इयर आणि अश्विन अधिकमास एकत्र आले आले आहेत. हा योग 160 वर्षांपूर्वी 1860 मध्ये आला होता.