पुणे(प्रतिनिधी)–शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.
स्व.मा.आ. कार्यसम्राट विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान समारंभ आज बालगंधर्व रंगमदिर येथे संपन्न झाला यावेळी डॉ. मुजुमदार बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बँकचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर होते, यावेळी माजी मंत्री तथा राज्य अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर , माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, आमदार सिद्धार्थ शिरोळे, डिजिटल टेक्नॉलॉजी विशेषतज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विशेषतज्ञ अजित जगताप सुप्रसिद्ध जगद्गुरुकृपांकित डॉ.चेतनंद महाराज पुणेकर, आयोजक सनी निम्हण आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. मुजुमदार म्हणाले, व्यक्तीला आपल्या कुटुंबामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये उन्नत व्हायचे असेल तर दोनच गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक म्हणजे गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम आरोग्य. सनी निम्हण यांनी या दोन्ही गोष्टींमध्ये लक्ष घालून त्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली.
मोबाईल मिळाला नाही तर जगण्यात अर्थ नाही असे आजकालच्या मुलांना वाटू लागले आहे. त्यामुळे पालकांना माझा सल्ला आहे की, आपल्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांना मोबाईलचे वेड तर लागलेले नाहीना, इतर कोणते व्यसन तर नाही ना, हे पहा. मोबाईलची सवय मोडण्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस मोबाईलचा उपवास करावा, असेही त्यांनी सांगितले.
अर्जुन खोतकर म्हणाले, वहिनी आणि सनी यांनी आबा गेल्या नंतरही त्यांच्याकडून मिळणारे ममत्व कायम ठेवले आहे. आबा आमच्यासाठी, समाजासाठी कस्तुरी समान होते, आबांचे कार्य राजकारणी आणि उद्योजक म्हणून आदर्श असे होते, त्यांचा वारसा सनी निम्हण यांनी चालवला आहे आणि भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना ते विनायकी च्या माध्यमातून घडवतील असा विश्वास आहे.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, विनायक निम्हण यांनी राजकारण करताना सामाजिक भान जपले आहे.एखादा सामजिक उपक्रम सुरू करून पुढे सातत्याने अनेक वर्षे सुरू ठेवणे हे सोपे नाही, मात्र आबांचा वारसा सनी निम्हण यांनी चालवला आहे, आयडॉल स्पर्धा असो की क्रीडा स्पर्धा यातून त्यांचे सामजिक योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
माजी मंत्री सुरेश नवले म्हणाले, आबा अजन्म कार्यकर्ते राहिले म्हणून ते कार्यसम्राट झाले. विनायकीच्या माध्यमातून आज गुणीजनांचा सन्मान करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती देण्याची महान परंपरा आपल्या देशाला आहे, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती दिली होती त्यातून देशाला एक महान व्यक्तिमत्व मिळाले. मनुष्य गुण आणि अवगुणाची खाण आहे, त्यातील गुणवंत शोधणे आवश्यक असते. पुण्यातील विद्यार्थ्यांना घडवणारा जोहरी सनी निम्हण यांच्या रूपाने उभा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
प्रास्ताविक करताना सनी निम्हण म्हणाले, सामाजिक काम करणे म्हणजे केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर सामाजिक भान देणारे सांस्कृतिक, शैक्षणिक वातावरण आवश्यक असते हे आबांनी सांगितले . विनायकी म्हणजे काय हे आईने आम्हाला शिकवले, आम्ही जे काम सुरू केले आहे ते कायम सुरू ठेवण्यासाठी आम्हाला आबांची प्रेरणा आहे. हि शिष्यवृत्ती फक्त आर्थिक मदत नाही तर तुमची स्वप्न पूर्ण होतील ही आबांची ग्वाही आहे. तुमच्या पुढील वाटचाली साठी प्रेरणा आहे. एक चांगला समाज घडवण्याची माझी भावना आहे. एक सशक्त भारत यातूनच निर्माण होईल असा आमचा विश्वास आहे.
डॉ. शिकारपूर म्हणाले, 26 वर्षा पूर्वी मी आबांना भेटलो होतो, आपली वेबसाईट सुरू करणारे ते देशातील पहिले आमदार होते, आजच्या मुलांनी परदेशी भाषा शिकायला पाहिजे, विशेषतः आपण आज जपानी शिकण्याची गरज आहे कारण त्यात सर्वाधिक संधी भविष्यात उपलब्ध होणार आहेत. जपानचे आपले संबंध चांगले आहेत त्यामुळे त्यांची धोरणे भारतीयांना पूरक आहेत त्याचा फायदा युवा पिढीला होणार आहे.
चैतन्य महाराज पुणेकर म्हणाले, आपण जेव्हा मुलांना हे करा ते करू नका सांगतो तेव्हा आपण स्वतः ते करतो का याचे अवलोकन पालकांनी केले पाहिजे. मुलांनी कोणतेही शिक्षण घेऊ दे त्यांना पालकांनी अध्यात्माची शिकवण दिली पाहिजे. आध्यात्म मुलांना जीवन जगण्याची कला शिकवत. त्यामुळे मुलांवर एकच ध्येय, एकच आयुष्य याचे संस्कार होतात. अर्थात यासाठी मुलांना पोषक वातावरण मिळणे देखील गरजेचे आहे.
अनासकर म्हणाले, आज विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे. पण उच्च शिक्षण घेतल्यावर त्यांच्यात नैतिकतेचा आभाव राहू नये यासाठी याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण नैतिकता नसेल तर उच्च शिक्षणाला अर्थ नाही.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार उमेश वाघ आणि अमित मुरकुटे यांनी मानले.