पुणे-अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यामध्ये नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही. माझ्यामते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही”.
“जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो. हे काही नवीन नाही. अनेक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात यापूर्वी आपण कधी हे पाहिलं नव्हतं. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. मला वाटतं याचा काही परिणाम होणार नाही. लोक देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नाही”, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक कशासाठी?
दिल्लीत झालेल्या बैठकीवर बोलताना शरद पवार यांनी माध्यमांवर चुकीचा अर्थ काढल्याचा आरोप केला. दिल्लीतील बैठक अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. ते आंदोलन अराजकीय असून तेथे राजकारण्यांना बाजूला ठेवण्यात आलाय. मात्र, त्यांना पाठिंबा देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करण्यात आली.
काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागतच!
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांना काँग्रेसनं घेतलेल्या स्वबळाच्या भूमिकेविषयी विचारलं असता त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागतच केलं. “प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:ची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही. आपल्या कार्यकर्त्यांची उमेद वाढावी यासाठी आम्ही सगळेच बोलत असतो. त्यासाठी काँग्रेस असे काही प्रयत्न करत असेल, तर त्यांचं आम्ही स्वागत करतो, हा प्रयत्न त्यांनी अवश्य करावा”, असं शरद पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटील कर्तृत्वान गृहस्थ
ठराव करुन चौकशीचे मागणी करण्याची (अजित पवार, अनिल परब) ही पहिलीच घटना आहे. चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत, यापूर्वी कधी झाल्या नाहीत त्या गोष्टी करण्यात त्यांचा लौकीक, त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं तर आश्चर्य नाही. चौकशी यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, त्यांचं स्वागत आमचे सर्व सहकारी करतील