पुणे-गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना मी ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही चाललंय ते त्यांना आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असे वक्तव्य भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केलं आहे.
पंढरपूर पॅटर्न महाराष्ट्रातही दिसेल
उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेथील प्रमुख विरोधी असलेले तिन्ही पक्ष एकत्र येऊनही उत्तर प्रदेशातील जनतेने भाजपा बहुमताने निवडून दिले. तोच पॅटर्न आपल्याला पंढरपूर पोटनिवडणुकीत दिसला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र लढूनही पंढरपुरात भाजपाचा उमेदवार निवडून आला. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना पक्षातील अनेक नेते आणि काठावर असलेले नेते भाजपाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पंढरपूर पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रभर दिसेल, असेही काकडे यांनी सांगितले.
देशात, राज्यात व पुणे शहरात भाजपा क्रमांक एकचा पक्ष आहे. येणाऱ्या काळात राज्यातील महत्वाच्या दहा महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. कोरोनाच्या परिस्थितीनुसारच त्या होतील. त्यामुळे पुढील काळात आपण पक्षाच्या हितासाठी आवश्यक तिथे पक्षाचे वरिष्ठ नेते देतील ती जबाबदारी पार पाडू, असेही संजय काकडे म्हणाले.पुणे