पुणे- जुन्नर येथील शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशनच्या पाच गिर्यारोहकांच्या पथकाने या स्वातंत्र्यदिनी लदाख मधील कांगयात्से २ शिखरावर यशस्वी चढाई करून तिरंगा फडकवला व राष्ट्रगीत गायले. अध्यक्ष निलेश खोकराळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत विकास सहाणे, किशोर साळवी, अरूण रासकर व संतोष डुकरे या प्रशिक्षित गिर्यारोहकांचा समावेश होता.
शिवनेरी ट्रेकर्स मार्फत २०२७ मध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या माऊंट एव्हरेस्ट शेतकरी मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून भारतीय हिमालयासोबतच नेपाळ व इतर ठिकाणी गिर्यारोहण मोहिमांचे आयोजन सुरु आहे. कांगयात्से २ ही या मालिकेतील पहिली यशस्वी मोहिम ठरली आहे. सहभागी सर्व सदस्य शेतकरी ट्रेकर, गिर्यारोहक आहेत. स्थानिक गिर्यारोहक स्टेन्झिन नोर्ब्रू यांनी मोहिमेचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
कांगयात्से २ हे लदाख हिमालयाच्या झंस्कार पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. मार्खा व्हॅली व हेमीस राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात असलेल्या या हिमाच्छादित शिखराची उंची ६२५० मीटर (२०,६०० फुट) आहे. आफ्रिका खंडातील किलिमंजारो व युरोप खंडातील माऊंट एलब्रुस या सर्वोच्च शिखरांहून अधिक उंच व आव्हानात्मक असलेले हे शिखर गिर्यारोहकांसाठी नेहमीच एक आव्हान ठरले आहे.
राज्य शासनाला सादर होणार अहवाल
या मोहिमेत सहभागी शेतकरी गिर्यारोहकांनी मार्खा खोर्यातील अतिशय संपन्न अशा पारंपरिक शेती पद्दतीचा मोहिमेदरम्यान तौलानिक अभ्यास केला असून त्यातून पुढे आलेली महत्वपूर्ण माहिती व निष्कर्षांचा सविस्तर अहवाल राज्य शासनाच्या कृषी विभागास सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल महाराष्ट्राच्या डोंगरी भागातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती विकासासाठी महत्वपूर्ण ठरू शकेल, असा विश्वास निलेश खोकराळे यांनी व्यक्त केला.
शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन– ही जुन्नरमधील शेतकरी तरुनांनी स्थापन केलेली ट्रेकिंग, गिर्यारोहण, ट्रायथलान, शोध व बचावकार्य इ साहसी क्रिडा कौशल्य संबंधित स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेमार्फत दर वर्षी शिवजयंती निमित्त जुन्नर येथे राज्यस्तरीय शिवनेरी मॅरेथॉन चे आयोजन केले जाते. राज्य शासनासह जुन्नरमधील सर्व संस्था संघटनांचा त्यात सक्रिय सहभाग असतो.